Shimga Festival 2020:  शिमगोत्सव निमित्त कोकणात दशावतार, जाखाडी नृत्य ते ग्रामदैवतेची पालखी नाचवणं असा असतो होळी सणाचा उत्साह!
Shimga Festival | Photo Credits: commons.wikimedia.org

Konkan Shimga Utsav 2020:  फाल्गुन महिना सुरू झाला की सार्‍यांनाच होळीचे वेध लागायला सुरूवात होते. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल देणारा हा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये कोकण आणि गोवा भागामध्ये होळीचा सण हा शिमगा (Shimga Festival) म्हणून साजरा केला जातो. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवानंतर शिमगोत्सवाची (Shigmotsav) विशेष उत्सुकता असते. फाल्गुन पंचमी पासून पौर्णिमेपर्यंत होळीच्या सणाची विशेष लगबग असते. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवणसह गोव्यात होलिकादहनापासून ग्रामदेवतांची पालखी नाचवणं, दशावतराची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. Holi 2020 Date: होळी कधी आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा.  

यंदा हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होलिका दहनाचा सण 9 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. त्यानंतर 10 मार्चला धुलिवंदन आणि 13 मार्च दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या सणामध्ये महिनाभर कोकणवासीय शिमगा महोत्सव साजरा करतात. मग पहा कशी असते या शिमगा महोत्सवाची कोकणातील धूम! Holi 2020 Special Trains: होळी निमित्त कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वे चालवणार पनवेल, मुंबई ते करमाळी स्थानकादरम्यान 20 विशेष ट्रेन्स

कोकणामध्ये कसा असतो होळी, शिमग्याचा सण?

कोकणामध्ये मोकळ्या मैदानाच्या जागी, सार्वजनिक ठिकाणी आंब्याच्या, ताडाच्या झाडाची पानं, झावळ्या, सुक्या काड्या तोडून आणल्या जातात. माडाच्या आणि पोफळीच्या झाडाचे ओंडके एकत्र आणून होळी रचली आणि सजवली जाते. त्यावर फुलांचे तोरण बनवले जाते. सूर्यास्तानंतर संध्याकाळी हुताशनी पौर्णिमेला ही होळी पेटवली जाते. त्याची विधीवत आणि गावकर्‍यांच्या मानाप्रमाणे पूजा होते. पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. होळीच्या निमित्ताने वातावरणातील आणि मनातील विनाशकारक विचार, दुर्गुण पेटून त्याचा नाश व्हावा या धारणेमधून बोंबा मारल्या जातात.

पालखी नाचवण्याचा खेळ

फाल्गुन शुक्ल पंचमी ते हुताशनी पौर्णिमा या दिवसामध्ये कोकणातील लहान मोठ्या गावांमध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी काढण्याची प्रथा असते. या पालखीमध्ये ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा ठेवल्या जातात. विशिष्ट तालामध्ये नाचत आणि नाचवत पालखी निघते. गावातील प्रत्येक वाडीमध्ये, घरासमोरून नाचवली जाते. सहाण म्हणजे गावाची चवडीची पण देव कार्याची जागा निवडली जाते. या ठिकाणी केवळ पालखीच्या कार्यक्रमादरम्यान देवकार्य केले जाते. प्रत्येक गावात पालखी नाचवण्याचा दिवस वेगवेगळा असतो. या पालखी नाचवण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक चाकरमानी मुंबई, पुण्यातून कोकणात आपल्या गावी जातात.

दशावतार आणि संकासूर

दशावतार आणि संकासूर हे कोकणातील स्थानिक लोककलाप्रकार आहेत. शिमग्याच्या निमित्ताने कोकणामध्ये त्याचे खास सांस्कृतिक सोहळे आयोजित केले जाते. यासोबतच कोकणामध्ये कोकणी भाषेतील नाटकं सादर करणं, जाखाडी नृत्य सादर करण्याची प्रथा आहे.

 

View this post on Instagram

 

"संकासुर"#kokan #holi #shimga #kokanlokdhara

A post shared by Nilesh Mukane (@mukanenilesh) on

यंदा 9 मार्चच्या रात्री होळी पेटवली जाणार आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी धुलिवंदनाच्या निमित्ताने रंग आणि पाण्यासोबतच होळीच्या लाकाडांच्या राखेने हा सण साजरा केला जातो. दरम्यान कोकणामध्ये होळीच्या रात्री जळती लाकडं फेकण्याच्या साहसी खेळ पाहण्यामध्येही खास गंमत आहे.