Chhatrapati Rajarshi Shahu महाराजांचा 137 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झाला होता राजतिलक; जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी
Shahu Maharaj| (Photo Credits: Wikipedia)

भारतीय समाजसुधारक आणी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj) यांचा महाराष्ट्री ओळख पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. कला ते शिक्षण आणि अनिष्ट प्रथांविरूद्धचा आवाज ते मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी भरीव कामगिरी केली आहे. आज 17 मार्च हा दिवस त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. 1884 साली आजच्या दिवशी त्यांचा राजतिलक झाला होता. कोल्हापूरच्या गादीवर शाहू महाराज 1884 ते 1922 साल पर्यंत होते. मग आजच्या या खास दिवशी जाणून घेऊ त्यांच्या भरीव योगदानादिवशी आणि त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसलेल्या काही गोष्टींबद्दल!

  • छत्रपती शाहू महाराज अर्थात राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू या नावाने ओळखले जायचे. त्यांनी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती म्हणून 1884 ते 1922 पर्यंत गादी सांभाळली.
  • कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना 'राजर्षी' ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली होती.
  • शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 साली रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला होता. जयसिंगराव आणि राधाबाई यांचे पुत्र शाहू होते. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते.
  • कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 दिवशी यशवंतराव यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण 'शाहू' ठेवले.
  • 1 एप्रिल 1891 दिवशी शाहू महाराज बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांची लेक लक्ष्मीबाई सोबत वयाच्या 17 व्या वर्षी विवाहबद्ध झाले.
  • शाहू महाराजांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले.
  • शाहू महाराजांनी स्त्री शिक्षण, बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून विशेष मेहनत केली.शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अस्पृश्यता मिटवण्याचा प्रयत्न केला.
  • शाहू महाराजांनी समाजात आंतरजातीय विवाह, विधवा पुर्नविवाह यांना मान्यता मिळवून दिली.
  • राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.

दरम्यान 6 मे 1922 दिवशी शाहू महाराजांचे मुंबई मध्ये निधन झाले. शाहू महाराजांचा जन्मदिवस हा आता महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.शाहू महाराजांच्या पश्चात विद्यार्थ्यांसाठी आणि बहुजनांच्या विकासांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.