Shahu Maharaj Jayanti Images & Facts: कोल्हापूर (Kolhapur) संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Rajashri Shahu Maharaj) यांची आज 145 वी जयंती (Birth Anniversary) आहे. तळागाळातील समाजाला वर आणण्याचे काम करणाऱ्या या रयतेच्या राजानं आयुष्यभर जातिभेदाविरुद्ध लढा दिला. त्यामुळेच आजही त्यांचे काम आणि व्यक्तिमत्तव महाराष्ट्राच्या इतिहासात कायम आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त अनेक ठिकाणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हेच औचित्य साधून जाणून घ्या, महाराष्ट्राच्या मातीतून देशाला समाज सुधारणेचे धडे देणाऱ्या या लोकनेत्याच्या व्यक्तिमत्वाचे काही खास पैलू..
शाहू महाराज हे नाव कसे पडले?
आपल्या कारकिर्दीत शाहू महाराज या नावाने ख्याती मिळवलेल्या या छत्रपतींचे मूळ नाव यशवंतराव होते. यशवंतरावांचा जन्म 26 जून, 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. वडिला जयसिंगराव (आप्पासाहेब) आणि आई राधाबाई यांचे ते सुपुत्र होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, त्यानंतर त्यांचे नाव शाहू ठेवण्यात आले होते. राजघराण्याचे वंशज असल्याने त्यांचे नाव यशवंतराव घाटगे यावरून शाहू भोसले असे करण्यात आले. नामकरण विधिनानंतर त्यांना अधिकृत रित्या राजघरण्यात प्रवेश मिळाला, ज्या नंतर 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती.
शाहूंचा जातीयवाद विरोधी लढा
बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात शालेय शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. बहुजन समाजाला राजकीय कामात स्थान मिळावे म्हणून त्यांनी 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.त्यांच्या कार्यकाळातील वेदोक्त प्रकरण हा अभ्यासाचा विषय मानला जातो. 6 जुलै 1902 ला शाहूंनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 % जागा राखीव करून दिल्या होत्या, मागास जातींसाठी घेण्यात आलेला हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय मानला जातो.
कलेला आश्रय
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले.
स्वातंत्रलढ्यातील योगदान
शाहूंनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक 31 जानेवारी 1920 ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ 2500 रुपयांची भरघोस मदत केली.
शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.