Savitribai Phule Jayanti: भारताची पहिली महिला शिक्षक सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष
'ज्ञानज्योती' म्हणजे सावित्रीबाई फुले (Photo Credits-Facebook Community Page/Wikimedia Commons)

Savitribai Phule 188th Birth Anniversary: भारताची पहिली महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती (Savitribai Phule Jayanti). सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा जन्म 3 जानेवरी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या बालिका विद्यालयाच्या प्रिन्सिपल होत्या. भारतातील पहिली महिला शिक्षिका होण्याच आणि शिक्षित महिला होण्याचाही मान सावित्रीबाई फुले यांना जातो. आपल्या शाळेत प्रामुख्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलींना शिक्षण दिले. केवळ महिला शिक्षिका म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान नाही. तर जवळपास अडिचशे वर्षांपूर्वी त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा हक्क मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि इतरही सामाजिक सुधारणांसाठी सावित्रीबाई यांनी निकराचे प्रयत्न केले.

सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांचे पती ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) हे थोर समाजसुधारक आणि लेखक होते. ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरत देशाला वेगळी दिशा दिली. त्यासाठी त्यांनी 1854 मध्ये एक शाळा काढली. या शाळेचे वैशिष्ट्य असे की, ही शाळा भारतातील महिलांसाठी सुरु झालेली पहिली शाळा होती. या शाळेत शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक मिळाला नाही. त्यामुळे ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनाच प्रथम शिक्षण दिले आणि या शाळेत शिक्षिका म्हणून उभे केले.

सावित्रीबाई फुले या भारतातील कन्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका बनल्या. सावित्रीबाई फुले या महिला असून, त्या शाळेत शिकवितात ही बाब त्या काळच्या कर्मट समाजाला पटली नाही. तत्कालीन समाजाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना तीव्र विरोध केला. इतका की सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड, शेण फेकले. त्यांची पुस्तकेही फाडली. मात्र, समाजाच्या विरोधाला फुले दाम्पत्य बधले नाही. त्यांनी नव्या उत्साहाने आणखी तीन-तीन शाळा काढल्या. सावित्रीबाई यांच्या अंगावर जेव्हा शेण आणि दगडाचा मारा होत असे त्या वेळी सावित्रीबाई साडी बदलत आणि पुन्हा शाळेत शिकवण्यासाठी हजर राहात.

इतिहासात दाखले मिळतात की, फुले दाम्पत्याने जो यशवंतराव नावाचा मुलगा दत्तक घेतला होता तो एका विधवा ब्राह्मण महिलेचा होता. त्यांनी आपल्या मुलासोबत एक रुग्णालय सुरु केले होते. याच रुग्णालयात पुढे सावित्रीबाई फुले प्लेग आणि महामारी यांसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा करत. प्लेग आजाराची लागण झालेल्या एका रुग्णाची सेवा करत असताना सावित्रीबाई यांनाही या आजाराचा संसर्ग झाला. या संसर्गाचे आजारात रुपांतर होऊन सावित्रीबाई फुले यांचे 10 मार्च 1897 या दिवशी निधन झाले.