
चैत्र शुद्ध नवमीला सूर्य माथ्यावर आल्यावर ठीक दुपारी 12 वाजता अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी प्रभू श्रीराम (Shri Ram) यांचा जन्म झाला होता. हा दिवस ‘राम नवमी’ (Rama Navami 2022) म्हणून साजरा केला जातो. यंदा 10 एप्रिल 2022 रोजी राम नवमीचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी दुपारी 12 वाजता कुंची घातलेला नारळ किंवा श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेऊन, प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला हळद कुंकू लावून पूजा करतात. चंपा, चमेली, केवडा, जुईची फुले रामाला अर्पण करून राम जन्मोत्सवाचा पाळणा म्हटला जातो. नंतर आरती करून प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो.
संपूर्ण देशभरात राम नवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. जेव्हा जेव्हा दुष्ट आणि वाईट प्रवृत्तींचा उच्छाद वाढला तेव्हा पृथ्वीवासीयांचे रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंनी भूतलावर अवतार धारण केला. प्रभू श्रीराम हे सुध्दा श्री विष्णूचाच सातवा अवतार आहेत.
असे मानले जाते की जे लोक राम नवमीची उपासना करून दैवी शक्ती प्राप्त करतात, त्यांच्या जीवनातून सर्व वाईट शक्ती निघून जातात. हा दिवस स्वत: ला शुद्ध करण्याचा सण मानला जातो. हा संपूर्ण दिवस भजन स्मरण, स्तोत्रपाठ, हवन करून उत्सव साजरा करण्यात येतो. तर या मंगलमय दिवशी शेजाऱ्यांना, मित्रांना, जवळच्या लोकांना खास Messages, Images, HD Images, Wishes पाठवून राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.





(हेही वाचा: रामनवमीसाठी खास सोप्या रांगोळी डिझाइन, पाहा व्हिडीओ)
दरम्यान, मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या आचरणातुन प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहुन सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकिय मर्यादा पाळत पुरूष सदाचरणी राहु शकतो याचे रामचंद्र प्रभु एक जिवंत उदाहरण आहे. प्रभू श्रीराम एक आदर्श पुरुष तर होतेच, तसेच ते एकवचनी, एक बाणी आणि एकपत्नी होते. मातृ-पितृभक्ती, बंधुप्रेम, सत्य-वचन, प्रजाप्रेम असे अनेक आदर्श गुण त्यांच्यामध्ये होते. म्हणूनच ज्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी असते अशा आदर्श राज्याला ‘रामराज्य’ म्हणतात.