हिंदू धर्मीय चैत्र शुद्ध नवमी हा दिवस श्रीराम नवमी (Ram Navami) म्हणून साजरी करतात. यंदा हा राम नवमीचा सोहळा 30 मार्च दिवशी साजरा करणार आहे. राम नवमी अर्थात चैत्र शुद्ध नवमी दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म झाला अशी आख्यायिका असल्याने राम भक्त या दिवशी राम जन्म सोहळा साजरा करतात. भारतात सर्वत्र राम मंदिरामध्ये या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राम भक्तांच्या धारणेनुसार 'राम' या उच्चारणाने त्यांना आत्मिक सुख मिळते. यामुळे मन आणि शरीरामधील चलबिचल कमी होण्यास मदत होते. मग यंदा राम जन्मोत्सव साजरा करण्यापूर्वी जाणून घ्या या दिवसाबाबतच्या काही खास गोष्टी आणि भगवान राम यांच्याबद्दलच्या फारशा ठाऊक नसलेल्या काही खास गोष्टी.
- मानवी रूपात पुजली जाणारी पहिली देवता
भगवान राम हे भगवान विष्णू यांचा सातवा अवतार आहे असे मानले जाते. त्यांचा जन्म त्रेता युगामध्ये झाला असल्याने मानवी रूपामध्ये त्यांना पूजलं जातं आणि मानवी रूपात पुजली जाणारी ही पहिलीच देवता आहे. त्रेतायुग सुमारे 1,296,000 वर्षांपूर्वी संपले. त्रेतायुगात भगवान विष्णूने रामाच्या व्यतिरिक्त वामन आणि परशुराम म्हणून अवतार घेतला होता.
- 11 हजार वर्ष राज्य
भगवान राम यांच्या राज्याला राम राज्य म्हणून संबोधलं जातं. हिंदू पुराणातील कथांनुसार भगवान राम यांनी 11 हजार वर्ष राज्य केले होते. नक्की वाचा: Ram Navami 2023 Date: रामनवमी कधी आहे ? श्रीरामाची पूजा करण्याची शुभ वेळ आणि पद्धत, जाणून घ्या.
- भगवान राम 'सूर्यवंशी'
भगवान राम यांचा जन्म इक्ष्वाकु घराण्यात झाला होता. ज्याची स्थापना भगवान सूर्याचा मुलगा इक्ष्वाकु याने केली होती. त्यामुळेच भगवान रामाला सूर्यवंशी असेही म्हणतात.
- राम भगवान विष्णूचं 394 वं नाव
- राम नाम उच्चारण
राम नामाचे तीनदा नामस्मरण करणे म्हणजे हजार देवतांचे स्मरण करण्यासारखे आहे. महाभारतात असे वर्णन आहे की एकदा भगवान शिव यांना म्हणाले की रामाचे नाव तीन वेळा जपल्याने हजार देवांच्या नावांचा जप केला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भगवान शिव देखील ध्यान करताना रामाचे नाव उच्चारतात.
- भगवान राम यांची समाधी
श्रीरामांची पत्नी सीतेने आपल्या शरीराचा त्याग करून पृथ्वीत विलीन झाली, त्यानंतर रामाने शरयू नदीत जलसमाधी घेऊन पृथ्वीलोक सोडला. प्रभू रामाने सर्वांसाठी जीवन जगण्याच्या योग्य मार्गाचा आदर्श मांडला आहे.
राम नवमी साजरी करताना दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माचा पाळणा जोजावला जातो. या दिवशी काही जण 8 प्रहर उपवास ठेवतात. या दिवशी आहारात काही जण दुधी भोपळा खाणं टाळतात. दिवसभर रामायण, रामचरितमानस किंवा कीर्तन भजनामध्ये स्वतः मन रमवतात. राम नवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची देखील सांगता केली जाते.