
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Messages in Marathi: महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि भावनिक दिवस म्हणून 6 मे ओळखला जातो. कारण याच दिवशी 1922 साली कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती आणि थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीला दरवर्षी लाखो लोक श्रद्धांजली अर्पण करतात आणि त्यांच्या प्रगतीशील विचारांचा आणि सामाजिक सुधारणांचा गौरव करतात. शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक समता आणि आर्थिक विकासासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे कुटुंबात यशवंतराव या नावाने शाहू महाराजांचा जन्म झाला.
त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे हे गावाचे प्रमुख होते, तर आई राधाबाई या मूधोळच्या राजघराण्यातून होत्या. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी आई गमावली. 1884 मध्ये, कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी राणी आनंदीबाई यांनी यशवंतराव यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले. 2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या 20 व्या वर्षी त्यांचा कोल्हापूरच्या गादीवर राज्याभिषेक झाला, आणि पुढील 28 वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थानावर राज्य केले.
शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या राज्यात सामाजिक समता, शिक्षण आणि आर्थिक समृद्धी यांना प्राधान्य दिले. त्यांच्यावर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा खोल प्रभाव होता, आणि त्यांनी जातीआधारीत भेदभाव आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली. 1902 मध्ये त्यांनी खालच्या जातींसाठी 50% आरक्षण लागू करून भारतातील पहिली सकारात्मक कृती योजना राबवली. याशिवाय, त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले, ज्यामुळे शिक्षणाचा प्रसार सर्व स्तरांवर झाला.
तर अशा या थोर राजाच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी Messages, Images, WhatsApp Status शेअर करून करा विनम्र अभिवादन.
दरम्यान, शाहू महाराजांनी महिलांच्या शिक्षणाला आणि हक्कांना प्रोत्साहन दिले, बालविवाह रोखले आणि विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. त्यांनी सत्यशोधक समाजाला पाठिंबा देऊन गैर-ब्राह्मण तरुणांना पुरोहित म्हणून प्रशिक्षण दिले, ज्यामुळे ब्राह्मणवादी वर्चस्वाला आव्हान दिले गेले. सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी संगीत, नाटक, चित्रकला आणि लोककला यांना प्रोत्साहन दिले. कुस्तीला राजाश्रय देऊन त्यांनी कोल्हापूरला कुस्तीचे माहेरघर बनवले. (हेही वाचा; Sant Tukaram Palkhi 2024: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, 18 जूनपासून देहू येथून करणार प्रस्थान)
शाहू महाराजांचे अंतिम दिवस शारीरिक आणि मानसिक त्रासात गेले. त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी राजवाड्यातील ऐश्वर्याचा त्याग केला आणि सोनतळी येथील आश्रमात साधेपणाने राहू लागले. तरीही, त्यांनी आपले सामाजिक कार्य आणि जनतेशी संपर्क कायम ठेवला. 6 मे 1922 रोजी सकाळी 6 वाजता मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.