देशभरात नवरात्रौत्सवाच्या सणाला उद्यापासून (29 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास 'शारदीय नवरात्र' असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे.आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे.
घटस्थापना ही अश्विन शुक्ल प्रतिपदा दिवशी केली जाते.या दिवशी घटाची स्थापना केल्यानंतर पुढील नऊ दिवस देवी मातेची मनोभावे पूजा केली जाते. तसेच देवीच्या पूजेदरम्यान काही व्रत विधी, नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. तर 'दगडी चाळीची आई माऊली', 'टेंभी नाका दुर्गेदुर्गेश्वरी' सह मुंबई, ठाणे मध्ये या सार्वजनिक नवरात्र मंडळांमध्ये खास असतो शारदीय नवरात्रोत्सव; पहा तेथे कसे पोहचाल?(Navratri 2019: घटस्थापना कशी करावी, त्याचे विधी, शुभ मुहूर्त काय? इथे पहा)
>>दगडी चाळीची आई माऊली
मुंबईतील भायखळा परिसरातील अरुण गवळी यांची देवी म्हणून 'दगडी चाळीची आई माऊली' प्रसिद्ध आहे. तर यंदा दगडी चाळीच्या देवीचे 46 वे वर्ष साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी देवीमातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून अनेक दिग्गज मंडळीसुद्धा येथे उपस्थिती लावताना दिसून येतात. दगडी चाळीची आई माऊली ही दागिन्यांनी मढलेली 6 फुटांची उभी चतुर्भुज मूर्ती पाहण्याजोगे असते. प्रत्येक वर्षी देवीच्या आरासाठी विविध प्रतिकृती उभारण्यात येते. तसेच भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात.
>कसे पोहचाल?
भायखळा पश्चिम रेल्वे स्थानकापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर दगडी चाळ येथे देवीमातेच्या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
>>अश्विन नाईक यांची देवी:
मुंबईतील आर्थर रोड येथील अश्विन नाईक यांच्या देवी मातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. देवीचे रुप हे साजेसे असून मनाला प्रसन्न करणारे आहे. देवीची मुर्ती चतुर्भुज असून तिच्या पाठी सिंह दिसून येते. तसेच देवीमातेचे दर्शन घेण्यासापूर्वी मोठी शानदास आरास भाविकांना येथे पाहायला मिळते.
>>कसे पोहचाल?
चिंचपोकळी रेल्वे स्थानकातून उतरल्यावर 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आर्थर रोडच्या सुरुवातीलाच या देवीचे दर्शन तुम्हाला घेता येणार आहे.
>>'टेंभी नाका दुर्गेदुर्गेश्वरी'
ठाण्यातील मानाची देवी म्हणून 'टेंभी नाका दुर्गेदुर्गेश्वरी' म्हणून ओळख आहे. दुर्गेदुर्गेश्वरी ही देवी माता धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओखळली जात असून या देवीची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. या देवीचा चेहरा हा अतिशय मनाला मोहून टाकणारा आहे. तसेच दिघे साहेबांची वाघावर बसलेली अष्टभूज मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तर ठाण्यातील स्थानिक नेतेमंडळी खासकरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या भक्तिभावाने या देवीची पूजा केली जाते.
>कसे पोहचाल?
ठाणे पश्चिमेला असलेल्या चराई या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेस्थानकातून शेअरिंग रिक्षाने तुम्हाला येथे पोहता येणार आहे. मात्र नवरात्रौत्सवादरम्यान या देवीच्या दर्शनासाठी काही मार्गात बदल करण्यात येतो.(Tembhi Naka Devi 2019: ठाण्याच्या 'दुर्गेश्वरी देवी' चा यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवाचं पहा संपूर्ण वेळापत्रक)
महाराष्ट्रासह नवरात्रीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि,महागौरी, सिद्धिदात्री अशा नऊ अवतारांची पूजा केली जाते. काही ठिकाणी नऊ रंगांमध्ये या नऊ अवतारांची सजावट केली जाते. त्यामुळे तुम्हीही आत्तापासून तयारीला लागा आणि यंदाच्या नवरात्रीसाठी तुमच्या कपाटामध्ये या नऊ रंगांचे कपडे सज्ज ठेवा.