Navratri 2019: घटस्थापना कशी करावी, त्याचे विधी, शुभ मुहूर्त काय? इथे पहा
Ghatasthapana 2019 (Photo Credits: Commons.Wikimedia)

Ghatasthapana 2019 Date, Shubh Muhurat:  घटस्थापना हा नवरात्रीच्या सणामधील पहिला आणि महत्त्वाचा दिवस आहे. यंदा 29 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरूवात होत असल्याने या दिवशी घरात घटाची स्थापना (Ghatasthapana Kalash) करून पुढील नऊ दिवस त्याची पूजा करून दहाव्या म्हणजे दसर्‍याच्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं. मग आदिशक्तीच्या जागरासाठी केल्या जाणार्‍या या पूजेदरम्यान काही व्रत विधी, नियम पाळले जातात. घटस्थापना ही अश्विन शुक्ल प्रतिपदा दिवशी केली जाते. मग जाणून घ्या यंदा घटस्थापना (Ghatasthapana) करण्याचा शुभ मुहूर्त कोणता? घरच्या घरी घटस्थापना कशी कराल आणि पुढील नऊ दिवस त्याची पूजा करताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवाल? तसेच तुम्हांला काही कराणास्तव घटस्थापनाच्या मुहूर्त वेळावर घट बसवता आले नाहीत तर दिवसभरातील अभिजीत मुहूर्तावरदेखील घटाची स्थापना केली जाऊ शकते. Navratri Colours 2019: यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते? पहा शारदीय नवरात्रीचं संपूर्ण वेळापत्रक

घटस्थापना करण्यासाठी शुभ वेळ कोणती?

घटस्थापना यंदा रविवार, 29 सप्टेंबर 2019 दिवशी केली जाणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी 06:29 ते 07:50 या सुमारे 1 तास 21 मिनिटांच्या शुभ मुहुर्ताच्या काळात घटस्थापना करणं अधिक फायदेशीर आहे. तर तुम्हांला इतक्या सकाळी उठून घटस्थापना करणं शक्य नसेल तर दुपारी 12:05 ते 12:53 या सुमारे 48 मिनिटांच्या काळातील अभिजीत मुहुर्तावरदेखील घटस्थापना केली जाऊ शकते.

घटस्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस आहे. त्यामुळे यंदा प्रतिपदा तिथी 28 सप्टेंबर दिवशी दुपारी 11.56 ला सुरू होत आहे तर 29 सप्टेंबर दिवशी रात्री 8.14 वाजता संपणार आहे. Kanya Pujan 2019 Date: शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी दिवशी कन्या पूजन करण्याचं महत्त्व, शुभ वेळ काय?

घटस्थापनेसाठी लागणेरे पुजेचे साहित्य:

शेतातील काळी माती, पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य (गहू किंवा कडधान्य), विड्याची पानं, हळद-कुंकू, सुपारी, आणि अन्य पूजेचे साहित्य.

कशी करावी घटस्थापना?

- सर्वप्रथम चौरंग किंवा पाटाच्या आकाराची रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घालावे. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.

- चौरंग/पाट त्यावर लाल वस्त्र अंथरावे.

- टोपल्यात किंवा परातीत माती घालून त्यात मिश्र धान्य पेरावे. मधोमध कलश ठेवावा. कलशात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सुट्टे पैसे घालावे. कलशाला हळदी कुंकुवाची उभी बोटे उठवावी. कलशात बाजूला विट्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवावा.

- कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवावे.

- मग हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून मनोभावे पुजा करावी.

- प्रत्येक दिवसाला एक अशी फुलांची माळ कलशावर सोडावी.

- दर दिवशी नैवेद्य दाखवून आरती करावी.

- आवड असल्यास नवरात्रीच्या काळात तुम्ही धूप करु शकता.

- परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा फुलाने थोडेसे पाणी शिंपडावे. नऊ दिवसात ते जोमाने वाढतात. त्या वाढीनुसार आपल्या घराची भरभराट होते, असे म्हटले जाते.

अनेकजण घटस्थापानेपासून पुढील नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काही जण निर्जळी उपवास करतात. तर काहीजण केवळ घट उठता बसता म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदा आणि अष्टमी, नवमी दिवशी उपवास करतात आणि दसर्‍याच्या दिवशी हे उपवास सोडले जातात.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)