नवरात्री 2019 (Photo Credits: File Image)

गणपतीनंतर शरद ऋतूत देवीचा नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव (Navratri 2019) साजरा केला, याला शारदीय नवरात्र म्हटले जाते. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेचा जागर केला जातो. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्मांडी (किंवा कुष्मांडी), स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत. या काळात देवीला नऊ फुलांच्या माळा वाहण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी ही नऊ फुले मिळत नसली तर झेंडूची फुले वाहिली जातात. तर चला पाहूया कोणती आहेत ही फुले -

पहिली माळ - शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ - अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ

तिसरी माळ - निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा

चौथी माळ - केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले

पाचवी माळ - बेल किंवा कुंकवाची माळ

सहावी माळ - कर्दळीच्या फुलांची माळ

सातवी माळ - झेंडू किंवा नारिंगीची फुले

आठवी माळ - तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ

नववी माळ - कुंकुमार्चन करतात

तर अशा या नऊ दिवसांच्या नऊ माळा आहेत. या नवरात्रीच्या देवीला नऊ दिवस नऊ विविध रंगांच्या साड्या परिधान करण्याचीही प्रथा आहे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात या उत्सवाचे महत्व फार वाढले. पुढे पेशव्यांनीदेखील ही प्रथा अखंड चालू ठेवली. नवरात्रीनंतर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. याच दिवशी देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी आख्यायिका सांगितली जाते.