National Flag Adoption Day 2020: आजच्या दिवशी तिरंग्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मिळाला होता मान, वाचा ध्वजाशी संबंधित 'या'  खास गोष्टी
राष्ट्रध्वज (Photo Credits-Pixabay)

National Flag Adoption Day 2020: भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा देशाच्या अखंडतेचं प्रतीक आहे. देशात राहणाऱ्या विविध धर्माच्या, जातीच्या, संप्रदायांच्या, विचारांच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारा हा एक धागा आहे. या तिरंग्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे, कारण आजच्याच दिवशी 22 जुलै 1947 रोजी भारताने अधिकृत रित्या तिरंग्याला भारतचा राष्ट्राध्वज म्हणून स्वीकारले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला. तेव्हापासून आज 2020  म्हणजेच 73 वर्ष भारताची ओळख म्हणून हा राष्ट्रध्वज पाहिला जातो. केशरी, हिरवा, पांढऱ्या रंगाचा तिरंगा आणि त्यावर निळ्या रंगात अशोकचक्र अशा आपल्या राष्ट्रध्वजाचे स्वरूप केवळ रंगच नव्हे तर त्यामागे एक अर्थ घेऊन बनवण्यात आला आहे. हा राष्ट्रध्वज कोणी बनवला, त्या रंगांच्या मागे अर्थ काय या संबंधित काही न रोचक आणि महत्वाच्या गोष्टी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. चला तर मग..

भारताचा राष्ट्रध्वज कोणी बनवला?

भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा आंध्रप्रदेश मधील 'पिंगली वैंकैया' यांनी बनवला आहे. त्यांनी हे तिरंग्याचे डिझाईन बनवले आहे. 1963 साली जेव्हा वैंकैया यांचे निधन झाले तेव्हा त्यांनंतर 46 वर्षांनी त्यांच्या प्रतिमेचे पोस्टल स्टॅम्प बनवून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

तिरंग्याच्या डिझाईन मागील अर्थ काय?

भारताचा राष्ट्रध्वज आपल्या प्रत्येक रंगाचा एक अर्थ लक्षात ठेवून बनवण्यात आला आहे. आपण पाहू शकतो की, यात केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. यातील केशरी रंग वीरता, साहस आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे प्रतिनिधित्व करतो, पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग हा कृषिप्रधान भारताचे व निसर्गाचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं होतं तिरंग्याचे 'हे' महत्व

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हंटल्याप्रमाणे हिंदू, मुस्लिम, ईसाई, यहूदी, पारसी आणि अन्य सर्व धर्माच्या व्यक्तींसाठी तिरंग्याचा मान राखणे हे अनिवार्य आहे कारण या तिरंग्याखाली उभा असलेला प्रत्येक व्यक्ती हा कोण्या धर्माचा, जातीचा नसून तो एक भारतीय आहे. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा तिरंगा हा भारतासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक लढवय्याच्या भावनेचे प्रतीक आहे असे म्हंटले होते.

भारतात तिरंग्याशी संबंधित विशेष नियम सुद्धा बनवण्यात आले आहेत. तिरंगा फडकवण्यापासून ते हातळण्यापर्यंत कोणती काळजी घेतली जावी हे फ्लॅग कोड ऑफ इंडिया तर्फे सांगण्यात आले आहे.