Makar Sankranti 2020 (PC - File Photo)

Makar Sankranti 2020: नव्या वर्षाला सुरुवात झाल्यावर पहिल्याच महिन्यात 15 जानेवारीला मकर संक्रांत (Makar Sankranti) हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढचं शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते. या दिवसात प्रचंड प्रमाणात थंडी असते. तिळाचे सेवन केल्याने शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. तसेच तिळापासून विविध पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. आज या लेखातून आपण मकर संक्रात नेमकी का साजरी केली जाते हे जाणून घेणार आहोत.

म्हणून साजरी केली जाते मकर संक्रात -

संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो. परंतु, अनेकांना मकर संक्रात नेमकी का साजरी केली जाते? याबद्दल माहिती नसते. मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे, असं लहान मुलांना वाटतं. तसचं 'मकर' ही रास असल्याचंही सर्वांना माहित आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला 'मकर संक्रांत', असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे या सणाला 'मकर संक्रांत' असं म्हटलं जातं. (हेही वाचा - Paush Putrada Ekadashi 2020: पुत्रप्राप्ती साठी केल्या जाणाऱ्या पुत्रदा एकादशीचे महत्व काय? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि व्रत कथा)

मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे जो प्रत्येक वर्षी एकाच तारखेला येतो. हा सण 'पतंगांचा सण' म्हणून ओळखला जातो. परंतु, हा सण साजरा करण्यामागे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी उठून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. तसेच शरीराला 'व्हिटामिन डी'ही मिळते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायची प्रथा पडली.

मकर संक्रांतीच्या दिवशी महिला मंदिरात जाऊन एकमेकींना हळदी-कुंकू आणि वाण देतात. महिला मंडळ मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं. थोडक्यात महिलांसाठी संक्रांत हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासही विशेष महत्त्व असतं. त्यामागेही शास्त्रीय कारण असतं. अनेकदा सणासुदीला काळा रंग वर्ज्य करण्यात येतो. मात्र, मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. काळा रंग उष्णता शोषून घेतो. त्यामुळे या दिवशी काळा रंगाचे कपडे परिधान केले जातात. तसेच या दिवशी हलव्याचे दागिनेही घालण्याची प्रथा आहे.