इंग्रजी कालदर्शिकेच्या नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकरसंक्रांती (Makar Sankranti), भारतातील अनेक भागात अनेक रूपात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला वैज्ञानिक व अध्यात्मिक महत्व जोडलेले आहे. या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. या दिवसापासून हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. या सणाचा भारतीय सौर कालगणनेशी थेट संबंध आहे त्यामुळे शेतीवर प्रभाव पाडणाऱ्या या सणाचे शेतकरी बांधवांमध्ये विशेष महत्व असते. मकर संक्रांति च्या आदल्या दिवशी (14 जानेवारी) भोगी आणि पुढल्या दिवशी (16 जानेवारी) किंक्रांती साजरी केली जाते. हे तीन ही दिवस साजरे करण्यामागे खास महत्व आहे, ते नेमके काय? चला तर पाहुयात..(हे हि वाचा- जाणून घ्या मकर संक्रांत 2020 पुजा मुहूर्त)
दरवर्षी एकाच दिवशी (14 जानेवारी) येणारा हा सण यंदा लीप वर्ष असल्याने एक दिवस पुढे म्हणजेच 15 जानेवारी रोजी भारतात साजरा केला जाणार आहे.या सणाची पूजा विधी आणि नियम काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भोगी
पौष कृष्णपक्ष प्रतिपदा ह्या दिवशी भोगी हा सण आहे. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. शेतीत नवीन आलेल्या पिकांचा आनंद साजरा करत यादिवशी घरोघरी खास बेत केला जातो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.(हे ही वाचा- भोगीच्या भाजीची खास रेसिपी जाणून घ्या)
मकर संक्रांत
मकर संक्रांत दिवशी बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात. पाच बोळक्यांना दोरा बांधून त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे.मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी “तीळ -गुळ घ्या गोड बोला” म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात,
किंक्रांत
पौष कृष्ण तृतीया हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीने मारले होते. ह्या दिवशी चांगले काम करीत नाहीत. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून नमूद केलेला असतो. या दिवशी बारसे, लग्न, प्रवास करणे एखाद्या शुभकार्यासाठी बाहेर पडणे, स्थळे पाहण्याचा कार्यक्रम इत्यादी शुभकार्य केली जात नाही. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात त्या व्यक्तींवर सूर्यदेवाची कृपा बनून राहते, असे मानले जाते. त्यामुळे यंदा दान करून, आपल्या परिवारासोबत पतंग उडवून, तिळगुळाचे पदार्थ खाऊन हा सण आनंदाने साजरा करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांति सणाच्या खूप खूप शुभेच्छा!