मकर संक्रांतीच्या दिवशी (Makar Sankranti 2019) सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एका राशीतून दुसर्या राशीत सूर्याच्या प्रवेशास 'संक्रांती' म्हणतात. खरे तर, मकर संक्रांतीमधील, 'मकर' हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व 'संक्रांती' म्हणजे संक्रमण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला 'मकर संक्रांती' म्हणतात.
2020 मध्ये 14 जानेवारी रोजी रात्री 2.21 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. याच कारणास्तव यंदा मकर संक्रांतीचा उत्सव बुधवारी, 15 जानेवारी रोजी, सूर्योदय व्यापिनी तिथीमध्ये साजरा केला जाईल. यावर्षी मकर संक्रांतीला सूर्य आणि बुध एकत्रितपणे बुधादित्य योग बनवित आहेत. याशिवाय उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्याने वर्धमान नावाचा एक शुभ योग तयार होत आहे.
मकर संक्रांत पुजा मुहूर्त -
पुण्य काळ मुहूर्त : 07.15. 14 ते 12. 30 (कालावधी : 5 तास 14 मिनिटे)
महापुण्य काल मुहूर्त : 07.15.14 ते 09.15.14 (कालावधी : 2 तास 0 मिनिटे)
संक्रांत क्षण : 01.53.48
यंदा संक्रांतीचा उत्सव उत्तराफाल्गुनी नक्षत्रात, माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पंचमीला असणाऱ्या संक्रांतीच्या दरम्यान साजरा केला जाईल. यामुळे ही संक्रांत आनंद प्रदान करणार आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन 'गर्दभ' असणार आहे. सूर्याच्या उत्तरायणानंतर देवांचा ब्रह्ममुहूर्त उपासनेचा काळ सुरू होतो. या काळातच मूर्तीची प्रतिष्ठापना, गृहनिर्मिती, यज्ञ-कर्म आदी पुण्यकर्मे केली जातात. म्हणूनच मकर संक्रांतीच्या या पुण्यकाळात दानधर्मालाही महत्व आहे. संक्रांती गर्दभवर विराजमान होऊन, गुलाबी वस्त्र धारण करून, मिठाईचे सेवन करत दक्षिण पासून पश्चिम दिशेला जाईल.
दरम्यान, मकरसंक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो, यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म केला जातो. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असा एक समज आहे. संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे. चांगलेचुंगले, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला असा संदेश या सणातर्फे दिला जातो.