Mahavir Jayanti 2020: 'महावीर जयंती' हा जैन संप्रदयातील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी महावीर स्वामींचा जन्मदिवस साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील त्रयोदशी ला जैन (Jain) समाजातील 24 तीर्थंकारांपैकी शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस जैन धर्मीय (Jain religion) 'महावीर जयंती' (Mahavir Jayanti) म्हणून साजरा करतात. यंदा महावीर जयंती 6 एप्रिल 2020 म्हणजेच सोमवारी साजरी होत आहे. भगवान महावीरांनी संपूर्ण समाजाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला होता. त्यामुळे भगवान महावीर यांची शिकवण संपूर्ण जैन संप्रदायामध्ये महत्त्वाची मानली जाते.
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. भगवान वर्धमान यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले होते. श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार, भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता. तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विवाह केला नसून ते ब्रम्हचारी होते. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेवीसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. (हेही वाचा - Bank Holidays in April 2020: एप्रिल महिन्यात यंदा राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सह सुट्ट्यांमुळे 11 दिवस बंद राहणार बॅंकेचे आर्थिक व्यवहार)
भगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असतं. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले. त्यांनी बारा वर्षांपर्यंत मौन पाळले होते. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. भवगान महाविरांनी तप आणि ज्ञानाच्या आधारे सर्व इच्छा आणि विकार यांच्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे त्यांना 'महावीर' म्हणून ओळखले जावू लागले. जैन संप्रदयामध्ये महावीर जयंतीचा उत्सव अगदी आनंदात साजरा केला जातो. भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले.
महावीरांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रम्हचर्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले. देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. भगवान महावीरांच्या निर्वाणादिवशी घराघरात दिवे लावण्याची परंपरा आहे.