Maharana Pratap Jayanti 2019: मेवाडचे 13 वे राजपुत्र महाराणा प्रताप यांची 479 वी जयंती; जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी
महाराणा प्रताप जयंती 2019 (Photo Credit: Wikimedia Commons)

आपली वीरता, बहादुरी आणि हळदीघाटातील लढाईसाठी (Battle of Haldighat) प्रसिध्द असलेल्या महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांची आज, म्हणजेच 9 मे रोजी 479 वी जयंती. इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी ज्यांचे नाव कोरले गेले असे, महाराणा प्रताप मेवाड घराण्याचे 13 वे राजपुत्र (King of Mewar) होते. ज्यांचा जन्म मेवाडच्या शाही घराण्यात 9 मे 1540 रोजी झाला. महाराणा उदयसिंह आणि माता जयवंताबी यांच्या पोटी, कुंभलगड इथे त्यांचा जन्म झाला. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू राजपूत होते. आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पाहूया त्यांच्याबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी.

  • महाराणा प्रताप हे 80 किलो वजनाचा भाला आणि 12 किलो वजनाचे छाती कवच बाळगून वावरायचे. त्यांच्याजवळ असणाऱ्या भाला, कवच, ढाल आणि दोन तलवारींचे वजन मिळून 208 किलो एवढे भरायचे.
  • मुघल वादशाह अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यादरम्यान 18 जून 1576 हळदीघाटातील युद्ध झाले होते. हे युद्ध महाभारताच्या युद्धासारखे विनाशकारी सिद्ध झाले.
  • अकबराच्या 85,000 सैनिकांच्या विशाल सैन्यासमोर आपल्या केवळ 20,000 सैनिक आणि तोकड्या शस्त्रास्त्रांच्या आधारे महाराणा प्रताप यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. सलग 30 वर्षांच्या प्रयत्नांनंतरही अकबराला महाराणा प्रताप यांना बंदी बनवता आले नाही.
  • महाराणा प्रताप यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचा घोडा चेतकही त्यांच्याबरोबर लढत होता. जेव्हा मोगलांची सेना त्यांचा पाठलाग करत होती, तेव्हा चेतकने 26 फुटांचा नाला एका उडीत पार केला होता. मोगलांच्या सैन्याला मात्र हा नाला पार करता आला नव्हता.
  • महाराणा प्रताप यांनी शपथ घेतली होती की जोवर चित्तोड परत मिळवत नाही तोवर जमिनीवर झोपेन आणि पालापाचोळा खाऊन दिवस काढेन. त्यांची ही शपथ पूर्ण होऊ शकली नाही, या शपथेचा मान राखत आजही अनेक राजपूत आपल्या जेवणाच्या ताटाखाली झाडाचे पान ठेवतात आणि उशीखाली थोडेसे सुकलेले गवत ठेवतात. (हेही वाचा: Parshuram jayanti 2019: कोकण, गोवा, केरळ आदी ठिकाणी आढळतात परशुराम यांची मंदिरे कारण..)
  • महाराणा प्रताप यांनी एकूण 11 विवाह केले होते, हे सर्व  विवाह राजकीय कारणास्तव होते. त्यांना 17 मुलगे आणि 5 मुली होत्या. राणी अजाब्देपासून झालेल्या मुलगा अमर सिंह याला त्यांचा उत्तराधिकारी बनवण्यात आले.
  • राजस्थानच्या अनेक लोकगीतांमध्ये असा उल्लेख पाहायला मिळतो की जेव्हा महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला तेव्हा खुद्द अकबराला ही अश्रू अनावर झाले होते.
  • मुघलांसमोर मान तुकवा, अर्धा हिंदोस्तान देतो’, असा प्रस्ताव अकबराने राणा प्रताप यांच्यासमोर ठेवला होता. मात्र त्यांनी अकबराचा प्रस्ताव थेट धुडकावून लावला.

    मेवाडचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉण्ड याने राणा प्रताप यांचा गौरव करतांना म्हटले आहे,  `प्रबळ महत्त्वाकांक्षा, शासन निपुणता आणि अपरिमित साधनसंपत्ती यांच्या जोरावर अकबराने दृढनिश्चयी, धैर्यशाली, उज्ज्वल कीर्तीमान आणि साहसी अशा प्रतापला नमवण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला.'