महाराष्ट्रात दिवाळीची सुरूवात वसूबारस (Vasu Baras) सणापासून होत असली तरीही नरक चतुर्दशी दिवशी पहिल्या आंघोळीला आणि लक्ष्मी पूजनाला (Laxmi Pujan) विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मीय दीपोत्सव म्हणून दिवाळीचा सण साजरा करतात. दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मी पूजन तिन्ही सांजेला करून घरात धनसंपत्ती कायम राहो यासाठी प्रार्थना केली जाते. यंदा 12 नोव्हेंबर दिवशी पहाटे नरक चतुर्दशी आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन साजरं केलं जाणार आहे. लक्ष्मी पूजनामध्ये नेमकी ही पूजा कशी आणि कोणत्या वेळी करावी असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या लक्ष्मी पूजनाचा यंदाचा मुहूर्त काय आहे? Easy Diwali Rangoli Designs: वसूबारस ते भाऊबीज दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणानुसार झटपट काढा आकर्षक रांगोळी (Watch Video) .
लक्ष्मी पूजन मुहूर्त काय?
12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन साजरं केलं जाणार आहे. या दिवशी संध्याकाळी 5.59 ते रात्री 8.33 या वेळेमध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. सायंकाळी 5.59 ते रात्री 9.11 पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहे. रात्री 1.58 ते उत्तर रात्री 3.34 पर्यंत लाभ आणि उत्तर रात्री 5.10 ते ते 6.47 पर्यंत शुभ योग असून या काळात लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन करावं.
सर्व प्रथम एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा नवीन कपडा घालावा. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू आणि फुल वाहावे. मग एक चांदी, तांबा किंवा मातीचा तांब्या घेऊन त्यात गंगाजल घ्यावे आणि नारळ ठेवून त्यात विड्याचे पान किंवा आंब्याचे पान ठेवावे. लक्ष्मीची मूर्ती स्थापित करतांना कलशच्या डाव्या बाजूला स्थापित करावी आणि मूर्ती स्थापित करण्यापूर्वी अक्षता, हळदी, कुंकू आणि एक नाणे ठेवावे आणि त्यावर मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. लक्ष्मीची मूर्ती स्थापित केली त्या विधीनुसार गणपतीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी पूजनच्या दिवशी कुबेरची पूजा केली जाते. कुबेरची मूर्ती असल्यास ती ही तुम्ही ठेऊ शकतात. आता अन्य वस्तू मूर्ती समोर मांडाव्या, जसे की लाल डायरी, सोने इतर मौल्यवान वस्तू, तसेच बनवलेले नैवेद्य जसे की गोड फराळ आणि इतर नैवेद्य ठेवावे. पूजेचे सामान शुद्ध करण्यासाठी प्रोक्षण करावे. यानंतर लक्ष्मी, गणपती आणि स्थापन केलेल्या अन्य देवतांचे आवाहन करावे. लक्ष्मी मंत्र किंवा ‘ऊँ महालक्ष्मयै नम:’ मंत्र उच्चारून स्थापन केलेल्या देवतांची पंचामृतासह षोडशोपचार पूजा करावी. यासोबतच माता लक्ष्मीच्या श्री सूक्ताचे पठण करावे. या पद्धतीने कुबेर आणि माता सरस्वतीची पूजा करावी. सर्व देवतांची पूजा केल्यानंतर हवन करावे, मग नंतर धूप, दीप, नैवैद्य अर्पण करावा. पूजा झाल्यावर मनोभावे आरती करावी. आरतीनंतर लक्ष्मी देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील गोष्टींची लेटेस्टली पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.