
Krishna Janmashtami 2024 Date: देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीची (Janmashtami 2024) जोरदार तयारी सुरू झाली आहे. यावर्षी, भगवान श्रीकृष्णाचा 5251 वा वाढदिवस असेल. यावेळी अनेक शुभ संयोगाने जन्माष्टमी साजरी केली जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. भादो महिन्याच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा करून उपवास केला जातो. यावेळी जन्माष्टमीच्या तिथीबाबत संभ्रम आहे. यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्टला सजी होईल, की 27 ऑगस्ट रोजी याबाबत सांशकता आहे.
तर ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाची जयंती गृहस्थ आणि वैष्णव लोक स्वतंत्रपणे साजरी करतात. गृहस्थांसाठी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणे आवश्यक मानले जाते, तर वैष्णव लोकांसाठी उदयकालिक अष्टमी तिथीसह रोहिणी नक्षत्र विशेष मानले जाते. सूर्योदयानुसार नक्षत्र आणि तिथीचे पालन करणारे वैष्णव 27 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी करतील.
यंदा सोमवार, 26 ऑगस्ट रोजी सूर्योदय पहाटे 5.40 वाजता होणार आहे. सूर्योदयाच्या वेळी भाद्रपद कृष्ण सप्तमी तिथी सकाळी 8.20 पर्यंत राहील. त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल, जी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6.34 पर्यंत चालेल. अशा 26 ऑगस्टला अष्टमी तिथी असल्याने याच दिवशी जन्माष्टमी साजरी होईल. यावर्षी, 26 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमीदिवशी, भाद्रपद महिना, मध्यरात्री अष्टमी तिथी, दिवस- सोमवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ चंद्र या सहाही घटकांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग होत आहे. (हेही वाचा: Krishna Janmashtami 2024 Rangoli Designs: गोकुळाष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात ही सोपी आणि सुंदर रांगोळी डिझाइन काढा)
कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 27 ऑगस्ट रोजी पहाटे 12.44 पर्यंत असेल. पुराणानुसार, अष्टमीला मध्यरात्री रोहिणीचा योग असल्यास, त्यात श्रीकृष्णाची पूजा केल्याने तीन जन्मांची पापे दूर होतात. या दिवशी उपवास केल्याने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ मिळते. कृष्ण जन्माष्टमीनंतर, दुसऱ्या दिवशी, मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी केली जाईल. हिंदूंसाठी जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे. हा प्रमुख सणांपैकी एक आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. विशेषतः तो मथुरा आणि वृंदावन तसेच वैष्णव आणि गैर-सांप्रदायिक समुदाय आढळणाऱ्या मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे साजरा केला जातो.
(टीप: ही माहिती इंटरनेट आधारीत आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही.)