Khandoba Navratri 2019: सहा दिवस थाटात साजरी होते खंडोबाची नवरात्री; जाणून घ्या चंपाषष्ठीचे महत्व आणि पूजा विधी
जेजुरी (संग्रहित संपादित प्रतिमा)

Khandobache Navaratra 2019: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक ठिकाणच्या भक्तांचे कुलदैवत म्हणून खंडोबाकडे (Khandoba) पहिले जाते. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. तर अशा या खंडेरायाचाही नवरात्र उत्सव (Navratri 2019) साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र साजरे होतात. यावर्षी हा उत्सव 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2019 दरम्यान साजरा केला जाणार आहे. चंपाषष्ठीला (Champa Shashthi) खंडोबा मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले होते. यामुळे पाच दिवसांच्या उपवासानंतर सहाव्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या दिवशी नवरात्राची सांगता होते.

असा साजरा केला जातो हा नवरात्रोत्सव -

नवरात्राच्या सहाही दिवस खंडोबासमोर नंदादीप अखंड तेवत ठेवतात. नवरात्राप्रमाणेच यावेळी रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. प्रत्येक दिवशी खंडोबाला बेल, दवणा, झेंडूची फुले, भंडारा वाहून पूजा केली जाते. चंपाषष्ठी हा उत्सवाचा मुख्य दिवस, हा दिवस विजयोत्सवाचे महाप्रतिक आहे. हिंदुधर्मानुसार ‘चंपाषष्ठी’ हा कालावधी देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो. यादिवशी ठोम्बरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण या पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

नैवैद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जाते. एका ताटात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण, ‘सदानंदाचा येळकोट’ किंवा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.

(हेही वाचा: Khandoba Navratri 2019 Dates: मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी दरम्यान रंगणारा खंडोबाचा नवरात्रौत्सव पहा यंदा कोणत्या दिवशी)

मणीसूर व मल्लासूर या दैत्यांसोबत शंकराने खंडोबाचे रूप घेऊन 6 दिवस युद्ध केले. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला हे युद्ध सुरु झाले होते. ज्या दिवशी हे युद्ध संपले तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी. राक्षसांशी झालेलल्या युध्दात 'खांड' नामक शस्त्राचा वापर कण्यात आल्याने, खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले.

खंडोबाच्या पूजेसाठी सोमवती अमावस्या, चैत्री श्रावणी, माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे. महाराष्ट्रातील जेजुरी येथे खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात इथे मोठ्या संख्येने भाविक जमतात. बहुतेक सर्व खंडोबा देवस्थानांत देवदीपावलीनिमित्त दीपोत्सव होतो, तो चंपाषष्ठीपर्यंत किंवा निदान त्या दिवशी असतो. श्री दावडी निमगांव मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानातर्फे हा चंपाषष्ठीचा दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो.