नवरात्रीची धामधूम संपली की प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये महिलांना करवा चौथ (Karwa Chauth) व्रताचे वेध लागतात. हिंदू धर्मीय विवाहित महिलांसाठी करवा चौथ हे अत्यंत महत्त्वाचं वर्त असते. विवाहित हिंदू महिला हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. यंदा करवा चौथ व्रत रविवार 24 ऑक्टोबर दिवशी साजरं केलं जाणार आहे. उत्तर भारतामध्ये कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला हे करवा चौथचं व्रत केले जाते. यंदा करवा चौथ सोबतच संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) देखील असल्याने या दिवसाचं महत्त्व द्विगुणित झालं आहे. संकष्टीला गणेशभक्त दु:ख हरण करण्यासाठी प्रार्थना करतात.
करवा चौथचं विवाहित महिला वर्गासाठी विशेष महत्त्व असतं. या दिवशी त्या दिवसभर पतीसाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. करवा चौथ व्रत करणार्या महिला त्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठतात. 'सरगी' चं सेवन करतात. सामान्यपणे सरगी हा व्रत करणार्या महिलेच्या सासूकडून तयार केलेला नाश्ता असतो. यामध्ये शेवय्याची खीर, दूध, ड्रायफूट्स यांचा समावेश असतो. यानंतर त्या रात्री चंद्र दर्शनापर्यंत अन्न पाण्याचा कणही घेत नाहीत. नक्की वाचा: करवा चौथ पूजेच्या ताटामध्ये 'या' गोष्टी आहेत आवश्यक; जाणून घ्या पूजा सामग्रीची संपूर्ण यादी.
करवा चौथ 2021 वेळा
- करवा चौथ उपवासाची वेळ: 24 ऑक्टोवर सकाळी 6.36 ते रात्री 8.46
- चंद्रोदयाची अंदाजे वेळ: रात्री 8 वाजून 46 मिनिटं
- चतुर्थी कधी सुरू होणार - 24 ऑक्टोबर 3 वाजून 1 मिनिटं
- चतुर्थी कधी संपणार - 25 ऑक्टोबर 5 वाजून 43 मिनिटं
द्रिक पंचांगानुसर, करवा चौथच्या दिवशी विवाहित महिला भगवान शंकर, गणरायाची, पार्वती मातेची आणि कार्तिकेयाची देखील पूजा करतात. तर या दिवसाचं व्रत देखील चंद्र दर्शनानेच समाप्त केले जाते. करवा चौथ दिवशी विवाहित महिला सारे सोळा शृंगार करतात. आजकाल पत्नी प्रमाणेच अनेक विवाहित पुरूष देखील आपल्या पत्नीला साथ देण्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. अशी मान्यता आहे की हे व्रत 12-16 वर्षापर्यंत केले जावं. तुमचं शरीर तुम्हांला साथ देत नसल्यास त्याचं उद्यापन करून व्रत कायमचं खंडीत करू शकता.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहलेला आहे. यामधील कशाचीही लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.