Makar Sankranti 2023 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती हा नव वर्षातील पहिला सण आहे. हा सण तिळगूळ वाटून, पतंग उडवून आनंदात साजरा केला जातो. या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुवासिनी सुगड पूजन करतात आणि एकमेकींना वाण देतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याची प्रथा आहे. 'सुघट' म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात 'सुगड' (Sugad) असा झाला.
शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी पूजले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगडाची पूजा करतात. महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुघड पुजून करून एकमेकींना वाण देतात. संक्रांतीनिमित्त सुगडाची पाटावर पूजा केली जाते. (हेही वाचा - 'मकर संक्रांत' नक्की का साजरी करतात; जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व)
मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे?
- सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडावी.
- पाटाभोवती छान रांगोळी काढावी.
- पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे.
- त्यावर सुगड मांडावे. सुगड मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू लावावे.
- यानंतर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या
- ओंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे.
- काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे.
- सुगडावर अक्षता, फुले, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा.
- यानंतर धूप, दीप अर्पण करावे.
- सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.
मकर संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार, जानेवारी महिन्याशी सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे.