Goa Liberation Day 2019: भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 14 वर्षांनी गोवा झाला होता मुक्त; अवघ्या 36 तासात पोर्तुगीजांनी पत्करली होती शरणागती, जाणून इतिहास
Goa Liberation Day 2019 (Photo Credits: File Image)

19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने गोवा (Goa), दमण आणि दीव येथे प्रवेश करत, साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून या भागांना मुक्त केले होते. आज या दिवसाचे औचित्य साधून गोव्यात ‘गोवा मुक्तीदिन’ साजरा केला जात आहे. ब्रिटिश व फ्रान्सने सर्व वसाहती अधिकार गमावल्यानंतरही, गोवा, दमण आणि दीव यांच्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. हा भाग परत करण्यासाठी भारत सरकारच्या वारंवार होणाऱ्या मागण्यांकडे पोर्तुगीजांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत सैन्याची एक छोटी तुकडी त्या परिसरात पाठविली. 36 तासांहून अधिक काळ जमीन, समुद्र आणि हवाई हल्ले झाले. त्यानंतर पोर्तुगीज सैन्याने 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याकडे बिनशर्त शरणागती पत्करली आणि तो भाग भारताच्या ताब्यात आला. अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी गोवा मुक्त झाला.

गोवा हे पश्चिम भारतातील एक छोटेसे राज्य. त्याचा आकार लहान असूनही हे राज्य एक मोठे व्यापारी केंद्र होते. भारतात व्यापारासाठी हे एक प्रवेशद्वारही होते. म्हणूनच मौर्य, सातवाहन आणि भोज राजवंशही गोव्याकडे आकर्षित झाले होते. इ.स. 1350 मध्ये गोवा बहमनी सल्तनतच्या अधिपत्याखाली गेला, परंतु 1370 मध्ये विजयनगर साम्राज्याने पुन्हा याला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर परत 1469 मध्ये बहमनी सल्तनतने गोव्याला काबीज केले. 1498 ला पोर्तुगीज खलाशी 'वास्को द गामा' याने गोव्यात पाऊल टाकले. त्यानंतर जवळजवळ साडेचारशे वर्षांनी 1961 रोजी गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झाला.

गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे जे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते. भारत स्वतंत्र झाला तरी गोवा पारतंत्र्यात होता. त्याकाळी पोर्तुगीजांच्या निर्बंधामुळे गोव्यातील लोकांना श्वास घेणे मुश्कील झाले होते. 18 जून 1946 रोजी मडगाव येथील डॉ. लोहिया यांच्या भाषणाने या मुक्तीसंग्रमाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी शांततापूर्वक गोवा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. (हेही वाचा: भाजप मुक्त गोवा बनवण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी सकारात्मक – संजय राऊत)

अखेरीस 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या. शत्रूचा पराभव करा किंवा मृत्यूला मिठी मारा, असा आदेश पोर्तुगीज सैन्याला देण्यात आला. पोर्तुगीज सैन्य भारतीय सैन्यासमोर अत्यंत कमकुवत सिद्ध झाले. भारताच्या 30 हजार सैन्यासमोर त्यांच्या साडेतीन हजार फौजाचा टिकाव लागला नाही. शेवटी पोर्तुगालचे गव्हर्नर जनरल वसालो इ सिल्वा यांनी भारतीय लष्कर प्रमुख पी.एन. थापर यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि गोवा भारताच्या ताब्यात आला.

पुढे 30 मे 1987 रोजी, गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. तर दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश राहिले. 'गोवा मुक्ति दिन' हा दरवर्षी 19 डिसेंबरला साजरा केला जातो.