Ganpati Pran Pratishtha Puja Vidhi: हिंदू धर्मात गणपती पूजेला विशेष महत्त्व आहे. अडथळे, समस्या दूर करणारा ‘विघ्नहर्ता’ ही कोणत्याही शुभ कार्यावेळी पहिली पूज्य देवता आहे. असे मानले जाते की श्रीगणेशाची आराधना केल्याने सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि शक्ती इत्यादींचा आशीर्वाद मिळतो. अशात उद्या, 19 सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) सुरु होत आहे. याचवेळी घरोघरी 10 दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतील. सध्या सर्वत्र या उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी लोक ढोल-ताशांच्या गजरात गणपतीला घरी घेऊन येऊन त्याची प्रतिष्ठापना करतात. त्यानंतर त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते.
गणपती मूर्ती स्थापना शुभ मुहूर्त:
हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12.39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1.43 वाजता समाप्त होईल. यावर्षी गणेश चतुर्थीचा सण मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी रवियोगाचा शुभ संयोगही घडत आहे. ज्योतिषांच्या मते 19 सप्टेंबर रोजी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:01 ते दुपारी 01:28 पर्यंत आहे.
असे मानले जाते की श्रीगणेशाचा जन्म मध्यान्हकाळात झाला होता, म्हणून दुपारची वेळ गणेश पूजेसाठी अधिक शुभ मानली जाते.
गणपती मूर्ती स्थापना पूजा विधी-
सर्व प्रथम एका स्वच्छ जागी पाट ठेऊन पाटावर गंगाजल शिंपडावे. त्यानंतर त्यावर लाल रंगाचे कापड पसरून त्यावर थोडे तांदूळ ठेवावे. या तांदळावर ऊँ गं गणपतये नमः.चा जप करत गणपतीची मूर्ती ठेवावी.
त्यानंतर कपाळाला गंध लावून आचमन करावे. देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी. गणपतीच्या शेजारी गणुराया ठेवावा. दुसऱ्या बाजूला पाच फळे ठेवावी.
गणपती समोर हातात फुले व अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात. (हेही वाचा: Ganpati Visarjan 2023 Date: 1.5, 3, 5, 7 दिवसाच्या 'गणपती विर्सजना'च्या तारखा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या)
त्यानंतर गणपतीला गंध, हळद कुंकू वहावे.
गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता वाहावे.
गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे.
त्यानंतर फुले, हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे.
त्यानंतर गणपतीची आरती करावी. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा.
दरम्यान, भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा गणेश व्रताचा आरंभ करण्याचा दिवस. प्रत्येक देवतेसाठी एक विशिष्ट तिथी निर्धारित करण्यात आली आहे. यानुसार गणपतीसाठी चतुर्थी येते म्हणून गणेशाच्या पुजेसाठी चतुर्थी तिथी पुजनीय आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच 'अनंत चतुर्दशी' या दहा दिवसांत गणेशोत्सव साजरा केला जातो.