Ganeshotsav 2021: लालबागचा राजा ते पुण्याचा दगडूशेठ गणपती, यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या कुठे घेऊ शकाल बाप्पाचं दर्शन; इथे पहा!
Lalbaugcha Raja File Image (Photo Credits-Facebook)

जगभरात विखुरलेले गणपती बाप्पाचे भारतीय भक्त दरवर्षी गणेश चतुर्थीची (Ganesh Chaturthi) वाट पाहत असतात. यंदा 10 सप्टेंबरला घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. पण यंदा सलग दुसर्‍या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने आता कडक नियमावलीत, अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्येच गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे. मुंबई, पुणे शहर म्हटलं की गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सवाचा गजबजाट आलाच. मुंबईत गणेशोत्सव काळात 24 तास गणपती मंडळांमध्ये गर्दी असते. चलतचित्र, आकर्षक देखावे पाहण्यासाठी तोबा गर्दी असते. पण यावर्षी कोरोना संकटामुळे यावर निर्बंध आहेत. लालबाग (Lalbagh) , परळ (Parel), गिरगाव (Girgaon) भागामध्ये असणारी लालबागचा राजा (Lalbaghcha Raja), खेतवाडीचा राजा (Khetwadicha Raja) अनेक गणेश मंडळं यंदा भाविकांच्या गर्दीविना सुनी सुनी असणार आहेत. पण बाप्पा आणि त्यांच्या भाविकांमधील अंतर कमी करण्यासाठी सुरक्षित दर्शनासाठी अनेक मंडळांनी यावर्षी ऑनलाईन दर्शन खुले ठेवलं आहे मग यावर्षी तुम्हांला मुंबई (Mumbai) , पुण्यातील (Pune) प्रसिद्ध गणपती मंडळांचं दर्शन घ्यायचं असल्यास नेमकं ते कुठे घ्याल? हा प्रश्न पडला असेल तर पहा या खास लिंक्स. (नक्की वाचा: Mumbai Fresh COVID 19 Guidelines For Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईत घरगुती,सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' नियमावलीचं असेल गणेशभक्तांवर बंधन).

लालबागचा राजा, मुंबई (Lalbaugcha Raja in Mumbai)

सर्वसामान्यांपासून राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडू सारेच लालबाग मध्ये चिंचोळ्या गल्लीत 'बाप्पाचं' दर्शन घेण्यासाठी येतात. मागील वर्षी लालबागचा राजा विराजमान झाला नव्हता पण यंदा मंडळाकडून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पासून अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही घरात बसून मंडळाच्या वेबसाईटवर, सोशल मीडीया हॅन्डल्स वर बाप्पाचं 24 तास दर्शन, आरती पाहू शकणार आहात.

अधिकृत वेबसाईट: https://www.lalbaugcharaja.com/MR/

दगडूशेठ गणपती, पुणे (Shreemant Dagdusheth Ganpati )

पुण्याचा प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती यंदा सलग दुसर्‍या वर्षी पारंपारिक जागी गणेश चतुर्थीच्या काळात नसेल तर तो मंदिरातच प्राणप्रतिष्ठा करून पूजला जाणार आहे. दगडूशेठचं दर्शनही ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहे. भाविकांनी मंदिरासमोरील रस्त्यावर गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. www.DagdushethGanpati.net वर दर्शन, आरती पाहता येणार आहे.

अंधेरीचा राजा, मुंबई (Andhericha Raja) 

अंधेरीचा राजा देखील मुंबईत प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला त्याचं विसर्जन न करता तो संकष्टीला विसर्जित केला जातो. यंदा स्वर्गाच्या थीमवर त्याची सजावट असून त्याचं मोफत दर्शनही ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

अधिकृत वेबसाईट: http://www.andhericharaja.com/

कसबा पेठ, पुणे (Kasba Ganpati) 

कसबा पेठ हा पुण्यातील 5 मानाच्या गणपतींपैकी पहिला गणपती आहे. या गणपतीच्या पूजनासाठी सुरूवात 1893 साली झाली. कसबा पेठच्या सोशल मीडीया हॅन्डल वर त्याचे अपडेट्स मिळतील. येथेच ऑनलाईन दर्शनाची सोय केली जाऊ शकते.

अधिकृत वेबसाईट: http://www.kasbaganpati.org/

चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबई (Chinchpoklicha Chintamani)

दक्षिण मुंबई मधील लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेला चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा मातीच्या मूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीचंच पूजन करणार आहे. 101 वर्षाची या मंडळाची प्रथा आहे. या गणपती मंडळाचे अपडेट्स त्यांच्या सोशल मीडीया हॅन्डल्सवर तुम्हांला मिळतील.

राज्य सरकारने यावर्षी जारी केलेल्या कोविड 19 नियमावलीनुसार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये 4 फूटाची मूर्ती असेल. तसेच मंडपामध्ये 5 पेक्षा अधिक लोकांना एकावेळी परवानगी नसेल.