Ganpati Sthapana Vidhi: उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी. या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाचे आगमन होते. त्यामुळे या चतुर्थीला 'गणेश चतुर्थी' असे म्हणतात. यंदा शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी 'गणेश चतुर्थी' आहे. यापुढे 10 दिवस हा उत्सव चालणार आहे. पूजा, आरती, नैवेद्य, भजन यात गणेशोत्सवाचे दिवस अगदी आनंदात आणि मंगलमय वातावरणात जातील. त्यापूर्वी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त, विधी काय? याविषयी जाणून घेऊया... (Ganesh Chaturthi 2021 Messages: गणेश चतुर्थी निमित्त खास मराठी WhatsApp Status, Wishes, Images शेअर करून द्या या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा)
गणपती स्थापना शुभ मुहूर्त:
शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी गणरायाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळच्या प्रहरापासून सुरु होत आहे. त्यामुळे दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करु शकता. परंतु, गणरायाची पूजा शक्यतो सकाळच्या वेळेसच केली जाते. ब्राह्मणाची उपलब्धता, इतर तयारी यानुसार बाप्पाची स्थापना केली जाते.
पूजा विधी:
मुर्ती कापडाने झाकून ढोल-ताशांच्या गजरात घरी आणली जाते. दारात मुर्तीचे पाय धुवून अक्षता अर्पण करुन प्रवेश केला जातो. त्यानंतर पाटावर मुर्तीची स्थापना केली जाते. स्थापने पूर्वी पाटावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर मुर्ती ठेवली जाते. त्यानंतर मु्र्तीवर गंगाजल शिंपडून गणपतीला जानव घातलं जातं. सर्वप्रथम गणपतीला पंचामृताने स्नान घालून केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा अर्पण केली जाते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी गणरायाची पूजा करतात. आरती करुन घरी बनवलेल्या पक्वान्नाचा विशेषत: मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
आपल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येकजण दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा करतो. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते. रोज गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. एखाद्या दिवशी भजन होते. शेवटच्या दिवशी जागरण करुन खेळ खेळले जातात. अशाप्रकारे गणपती आगमनानंतर दिवस आनंदात आणि भक्तीमय वातावरणात निघून जातात. बाप्पाला ठरलेल्या वेळी निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच्या आगमनाची प्रतिक्षा केली जाते.