गणेशाचे वर्णन करावे तितके कमीच. अष्टविनायकामधील त्याच्या प्रत्येक रुपाचे विशेष असे महत्व आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नहर ( Vighnahar) हा सातवा गणपती आहे. विघ्नहर म्हणजे भक्तांचे विघ्न दूर करणारा म्हणून हा गणपती ओळखला जातो. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नहरला ओळखले जाते. ओझरमधील विघ्नहर मंदिरामागची आणि त्या गणपतीची विशेष अशी कथा आहे.
जाणून ओझरच्या विघ्नहरा विषयी:
1. मंदिर
ओझरच्या या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
2. जाण्याचा मार्ग
पुणे नाशिक महामार्गावर पुण्यापासून सुमारे 85 कि.मी. अंतरावर नारायणगावाजवळ ओझरचे (Ozar) विघ्नहर गणपतीचे मंदिर आहे.
हेही देखील वाचा- Ganeshotsav 2019: अष्टविनायकामधील पहिला गणपती 'मोरगावचा मोरेश्वर'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व
3. मूर्ती
विघ्नहराची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नहराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नहरा म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती असून पूर्वाभिमुख आहे. तसेच ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे.
4. इतिहास
हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती असला तरीही भक्तगण पाचव्या स्थानवरच याचे दर्शन करतात. राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने विघ्नासूराचा पराभव केल्यानंतर तो गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. त्यावेळी विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती उत्सव येथे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला येथे करण्यात येणारी दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते.