Ganeshotsav 2021: मोरगावचा मोरेश्वर'-अष्टविनायकामधील पहिला गणपती; मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व,  घ्या जाणून
मोरगावचा मोरेश्वर (संग्रहित-संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय, प्रतिष्ठीत आणि मानाची 8 गणपती स्थाने म्हणून अष्टविनायकाकडे (Ashtavinayak) पाहिले जाते. पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ही जागृत स्थाने आहेत. पेशव्यांच्या काळात या गणपतींना वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली. विविध कारणांनी गणपतीने ज्या ज्या ठिकाणी अवतार घेतला ती ठिकाणे आज अष्टविनायकाचा महिमा गात आहेत. 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) सुरुवात होत आहे. या काळात अनेक भक्तमंडळी या ठिकाणांना भेट देतात. या निमित्ताने चला पाहूया या प्रत्येक गणपतीचे महत्व.

मोरगाव - मोरेश्वर (Morgaon)–

सिंधू राक्षसाच्या जाचातून जनतेला वाचवण्यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाले होते. मोरगाव या ठिकाणी गणपतीने सिंधूचा वाढ केला होता.

मंदिर -

मोरेश्वरचा गणपती हा अष्टविनायकामधील पहिला गणपती आहे. पुण्यापासून 70 किमी अंतरावर मोरगाव इथे गणपतीचे प्रशस्थ मंदिर उभे आहे. हे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून, ते बहामनी काळात बांधले गेले असल्याची नोंद आहे. या मंदिराच्या चारही बाजूंना उंच मनोरे बांधले आहेत. महत्वाचे म्हणजे मुघलांचे आक्रमण होऊ नये म्हणून या मंदिराचा आकार मशिदीसारखा आहे. मंदिराच्या चहूबाजूंनी संरक्षण भिंत बांधलेली आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 11 पायऱ्या आहेत.

मूर्ती –

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मयूरेश्वराची पूर्वाभिमुख बैठी मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. समोर मूषक व मयूर आहेत. मंदिरामधील सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे.

या मंदिराच्या समोर नंदीची एक मूर्ती आहे. ही मूर्ती खरेतर शंकराच्या मंदिरासाठी नेली जात होती. मात्र रथाचे चाक तुटल्याने ती इथे ठेवण्यात आली. (हेही वाचा: Ganeshotsav 2019: गणपतीला प्रिय आहेत 20 पत्री; पूजेवेळी 'या' मंत्रोच्चाराने अर्पण करा वीस वृक्षांची पाने)

इतर माहिती –

थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी मोरेश्वराच्या पूजेचा वसा घेतला होता जो त्यांनी अखंड पाळला. श्री समर्थ रामदास स्वामींना 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती याच मंदिरात स्फुरल्याचे म्हटले जाते.

असे सांगतात की, ब्रह्मदेवाने स्वत: मोरेश्वराच्या मूळ मूर्तीची स्थापना केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत येथे आले असताना त्यांनी मूळ मूर्तीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून, तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त करून ठेवली व नियमीत पुजेसाठी सध्याच्या मूर्तीची स्थापना केली.

मंदिरातील मूळ मूर्ती सध्या मूर्तीच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात लोह आणि रत्नाच्या अणूंपासून बनवलेली आहे. सिंधू दैत्याने दोनवेळा त्या मूर्तीचा विध्वंस केला. मात्र, ब्रह्मदेवाने तिची पुनःप्रतिष्ठापणा केली.

मार्ग -

पुणे-सासवड-मोरगाव – 64 किमी

पुणे-चौफुला-मोरगाव 77 किमी

मुंबई ते मोरगाव - 225 कि.मी