बहुतेक गावांमध्ये एखादा देव किंवा स्थानिक देवतांना समर्पित जत्रा-मेळावे आयोजित केले जातात, मात्र महाराष्ट्रातील लातूर (Latur) जिल्ह्यातील उजेड (Ujed) गावात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘गांधीबाबा जत्रे’चे (Gandhibaba Jatra) आयोजन करण्यात येते. गेल्या 70 वर्षांपासून चालत आलेली ही जत्रा महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) समर्पित असून, धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन एकता, शांतता आणि सौहार्दाचे संदेश देणारी म्हणून ओळखली जाते. ही तीन दिवसांची जत्रा 25 जानेवारीपासून रते. या काळात संपूर्ण गाव आनंदाने न्हालेल्यासारखे दिसते. प्रत्येक घरासमोर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या आणि रस्त्यांवर लावलेल्या झेंड्यांमुळे गावाचे वातावरण उत्साहाने भारलेले असते.
गांधीजींप्रती असलेली ग्रामस्थांची निष्ठा आणि आदर या जत्रेच्या केंद्रस्थानी आहे. आज, शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला गावाच्या मध्यवर्ती चौकात आणण्यासाठी, उजेडच्या सरपंच नंदिनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली.
जत्रेत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात कृषी प्रदर्शन, मुलांसाठी स्पर्धा, कुस्तीच्या सामन्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे आसपासच्या गावांमधील लोकही मोठ्या संख्येने या जत्रेत सहभागी होतात. गांधीबाबा जत्रेचा इतिहास 1955 पासून सुरू होतो. जत्रा समितीचे अध्यक्ष अनंत जाधव यांनी सांगितले की, 1948 मध्ये गावातील शिव आणि मोईद्दिनसाब खद्री यांना समर्पित जत्रा थांबवण्यात आली. त्यानंतर काही वर्षे गावात कोणताही उत्सव झाला नाही. मात्र, 1955 मध्ये ग्रामस्थांनी धार्मिकतेवर आधारित नसलेली जत्रा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा: Republic Day 2025: महाराष्ट्रात दिवसभर शाळा? रविवारची सुट्टी रद्द? राज्यघटना वाचन आणि विविध कार्यक्रमांसह प्रजासत्ताक दिन होणार साजरा?)
त्यावेळी महात्मा गांधींच्या शांतता आणि एकतेच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त जत्रा भरविण्याची कल्पना मांडण्यात आली, आणि ती प्रत्यक्षात आणली. आता ही परंपरा अजूनही चालू आहे. जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे कुस्ती स्पर्धा, जी 27 जानेवारीला आयोजित जेली जाते व या स्पर्धेने यात्रेचा समारोप होतो. या स्पर्धेसाठी परिसरातील अनेक गावांतील लोक मोठ्या उत्साहाने येतात. गांधीबाबा जत्रा ही महात्मा गांधींना समर्पित देशातील पहिली जत्रा असल्याचे मानले जाते. प्रजासत्ताक दिनाशी जोडल्यामुळे या जत्रेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. उजेड गावातील ही अनोखी परंपरा आजही गांधीजींच्या विचारांना जपण्याचे कार्य करते.