Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांकडून तयार करवून घ्या खास भाषण; जाणून घ्या कोणत्या बाबींचा कराल समावेश
Dr Babasaheb Ambedkar | Wikipedia

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech: संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडक (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले होते. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Din 2023) म्हणून साजरा केला जातो. यंदा बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्यलढयामधील एक अग्रगण्य कार्यकर्ते आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतातील दलित आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. मानवी हक्कांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, लेखक, समाज सुधारक, भारतीय संविधानाचे जनक अशी अनेक बिरुदे मिरवणाऱ्या बाबासाहेबांच्या ‘महापरिनिर्वाण दिनी’, देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात.

बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कारही बौद्ध धर्माच्या नियमांनुसार करण्यात आले. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतरची मुक्ती असा होतो. त्यामुळे बाबासाहेबांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक शाळा-कॉलेजेसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमामध्ये तुमच्या घरातील कोणी लहान मुल भाषण करत असेल, तर अशा भाषणासाठी काही मुद्दे आम्ही इथे देत आहोत.

या पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही बाबासाहेबांच्याबद्दल एखादे छानसे भाषण लिहून देऊन ते लहान मुलांकडून पाठ करवून घेऊ शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला व त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. (हेही वाचा: Mahaparinirvan Diwas 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'महापरिनिर्वाण दिन' तारीख आणि महत्त्व घ्या जाणून)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई वडिलांचे नाव भिमाबाई व व रामजी हे होते.

त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये अनुक्रमे  एमए आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बार-ऍट -लॉ आणि डी.एस्सी.  पदवी देखील मिळवली. त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही  काही काळ शिक्षण घेतले. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.

15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी पीडित-शोषित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. यामध्‍ये मुख्यतः कामगारांची संख्या  मोठी होती.

15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.

भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामधील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून, 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने, त्यांना LL.D ची पदवी बहाल केली.

1954 मध्ये नेपाळ मध्ये काठमांडू इथे झालेल्या "जागतिक बौद्ध धर्म परिषदेत", बौद्ध भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'बोधिसत्व' ही पदवी प्रदान केली होती.

डॉ बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील काळाराम मंदिरामधे दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला, तर महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.

14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या  ऐतिहासिक समारंभात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

6 डिसेंबर 1956 रोजी पहाटे 12.15 वाजता दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्ष, 7 महिने होते.