Anandibai Joshi (Photo Credits: Wikimedia Commons)

Anandi Gopal Joshi Death Anniversary: भारताच्या पहिला महिला डॉक्टर म्हणून शिरपेचात तुरा खोवणा-या आनंदीबाई जोशी यांचे वयाच्या 21 व्या वर्षी क्षयरोगाने निधन झाले. 26 फेब्रुवारी 1887 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 31 मार्च 1865 मध्ये त्यांचा पुण्यात जन्म झाला. लग्नापूर्वीचे त्यांचे नवा यमुना होते. आपल्या पेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी आनंदीबाईंनी बालविवाह केला आणि इथून सुरु झाला आनंदीबाई जोशी यांचा नवा प्रवास. असा प्रवास ज्याने त्यांना भारतातील पहिला महिला डॉक्टर बनवले. ज्या काळात मुलींचे बालविवाह केले जायचे, शिक्षणाचा अधिकार नव्हता एवढंचे काय तर एकटीने घराबाहेर करणेही वर्ज्य होते अशा खडतर काळात आनंदीबाई परदेशात एकटी जाऊन पदवीधर होऊन डॉक्टर बनल्या.

हा प्रवास त्यांच्यासाठी म्हणावा तितका सोपा नव्हता. यासाठी सर्वात जास्त परिश्रम घेतले ते त्यांच्या पती गोपाळरावांनी. गोपाळराव जोशी यांचा हट्ट होता की त्यांच्या पत्नीला शिक्षण आणि इंग्रजी भाषा ही यायलाच पाहिजे. त्यासाठी जितकी मेहनत आनंदीबाईंनी घेतली. तितकीच मेहनत गोपाळरावांनीही घेतले.

गोपाळरावांशी लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीने शिकावे या हट्टापायी गोपाळराव हात धुऊन आनंदीबाईंच्या मागे लागले. यात अनेकदा समाजाचा, कुटूंबाचा विचार करुन आनंदीबाईंनी शिकण्यास नकार देखील दिला. मात्र गोपाळरावांनी त्यांचे काही एक ऐकले नाही. उलट कठीण प्रसंगी रागाच्या भरात त्यांनी तिला मारहाणही केली.

कोल्हापूर भेट आणि मुलींची शाळा

गोपाळरावांनी आनंदीबाईंना प्राथमिक शिक्षण दिले होते मात्र शालेय शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी आनंदीबाईंना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरला खास मुलीची शाळा आहे हे गोपाळरावांना समजलं तेव्हा त्यांनी स्वतःची बदली कोल्हापूरला करून घेतली आणि इंग्रजी मिशनरी स्कुलमध्ये आनंदीबाईंचे शिक्षण सुरु झाले. वर पाहता सुंदर वाटणारा प्रवास त्यांच्यासाठी खडतर होता. ख्रिस्ती मुली आनंदीबाईंना हीन वागणूक देत असत. मात्र अशा परिस्थितीतही त्या कणखर राहिल्या. एकीकडे रूढीवादी हिंदू आणि दुसरीकडे ख्रिस्ती सह विद्यार्थिनी यांच्या कडून होणारा त्रास त्यांच्या संयमाची परीक्षा पाहत होता. Anthem Tu ahes na: राहुल देशपांडे ते आदर्श शिंदे, रोहित राऊत यांनी विविध अंदाजात स्त्री चा महिमा सांगितलेलं 'अँथम तू आहेस ना!' (Video)

14व्या वर्षी बाळ गमावण

मातृत्व स्त्रीच्या जन्माला पूर्णत्व देते. अशातच नवजात बाळाचा काही दिवसात मृत्यू होणं या घटनेने आनंदीबाई हडबडल्या. वेळीच लक्षणं न समजल्याने उपचार देता न आल्याने चिमुकल्या जीवाचा मृत्यू होणं ही गोष्ट दुर्दैवी होती. पण याच घटनेने आनंदीबाईंना केवळ शिक्षण नाही तर डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याची प्रेरणा दिली. यानंतर आनंदीबाईंचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याकाळात परदेशी जाऊन शिक्षण घेणे सोपे नव्हते अशा वेळी सुरुवातीला आनंदीबाईंना यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल असे सांगण्यात आले. मात्र काहीही झालं तरी डॉक्टर ही पदवी आनंदीबाई जोशी या हिंदू नावापुढेच लागेल या निर्णयावर त्या ठाम होत्या.

कार्पेंटर बाईचं आयुष्यात येणं

Law Of Attraction ची किमया काय असते हे तुम्हांला आनंदीबाईंचं आयुष्य पाहून समजेल. एकीकडे गोपाळरावांची सरकारी नोकरी गेली होती. ख्रिस्ती धर्म न स्विकारता परदेशी शिक्षण घेण्याची शक्यता धूसर होती. मात्र अशातच अमेरिकेतून कार्पेंटर बाईचं पत्र आलं. आनंदीबाईंची शिक्षणाप्रती ओढ पाहून केवळ मासिकातील छापील पत्र पाहून अमेरिकेत शिक्षणाचा खर्च, राहण्याची सोय यांसाठी यांनी तयारी दाखवली. Woman's Medical College of Pennsylvania मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं.

पदवीदान सोहळा

अमेरिकेमध्ये वैद्यशास्त्राची पदवी मिळवणार्‍या आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचं कौतुक अमेरिका, भारतमध्ये झालंच मात्र त्यासोबत लंडनची राणी व्हिक्टोरिया यांनीदेखील आनंदीबाईचं कौतुक केलं होतं.

आनंदीबाईंनी आपल्यापुढे येणा-या प्रत्येक सकटाला धैर्याने तोंड दिले. मात्र मृत्यूला अडवू शकल्या नाही. क्षयरोगाच्या विळख्यात अडकलेल्या आनंदीबाईंनी 26 फेब्रुवारी 1887 साली जगाचा निरोप घेतला. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार, त्यांचे जिद्दी वृत्ती याचे प्रत्येकालाच अप्रूप आहे. आज असंख्य महिला नोकरीसाठी घराबाहेर पडण्यामागे आणि उच्च शिक्षण घेण्यामागे त्यांचा खारीचा वाटा आहे. अशा या महान स्त्रीला लेटेस्टली कडून भावपूर्ण श्रद्धांजली.