Abhyanga Snan | Photo Credits: Instagram

Abhyanga Snan Shubh Muhurat & Significance: दिव्यांचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी निमित्त रांगोळ्या, फटाके, नवे कपडे, गोडाधोडाचे पदार्थ यांची मेजवानी असते. त्याचप्रमाणे दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाचेही विशेष महत्त्व असते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी तेलाने मालिश करुन उटणं लावून अभ्यंगस्नान केले जाते. त्यानंतर चिराटी फोडून नवं वस्त्र परिधान करुन देवाचं दर्शन घेतलं जातं. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत फराळाचा आनंद घेतला जातो. मात्र यंदा अभ्यंगस्नानाचा शुभ मुहुर्त काय? अभ्यंगस्नान नेमकं का करतात? जाणून घेऊया...

यंदा अभ्यंगस्नान कधी कराल?

अभ्यंगस्नान नरक चतुर्दशी दिवशी केले जाते. यंदा नरक चतुर्दशी 14 नोव्हेंबर रोजी आहे.

अभ्यंगस्नानाचा शुभ मुहुर्त:

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. मात्र त्यासाठी ठराविक वेळ असते. यंदा हा मुहुर्त पहाटे 5.23 ते 6.43 मिनिटांपर्यंत आहे. (Diwali 2020 Advance Messages: दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, SMS, GIFs, Images च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा दीपोत्सव!)

अभ्यंगस्नानाचे महत्त्व:

अभ्यंग स्नान हा पवित्र स्नानाचा विधी आहे. अभ्यंग स्नान दुष्टतेच्या निर्मूलनाचे प्रतीक आहे. ती शुद्धीकरण प्रक्रिया आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी तिळाच्या तेलाने मालिश करतात. त्यानंतर विविध प्रकारचे सुगंधित औषधी वनस्पती आणि डाळींनी बनविलेले उटणं लावून स्नान केले जाते. यामुळे शरीर स्वच्छ होऊन त्वचेत आर्द्रता टिकून राहते. मृत पेशी निघून जातात. परिणामी अगदी प्रसन्न, ताजेतवाने वाटते. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने कोरड्या पडलेल्या त्वचेला अभ्यंगस्नानामुळे टवटवीतपणा येतो.

आपल्याकडे प्रत्येक सणाला अर्थ आहे. प्रत्येक विधीमागे विचार आहे. त्यामुळे परंपरेने चालत आलेल्या अभ्यंगस्नानालाही सखोल अर्थ आणि महत्त्व आहे. आळस आणि नकारात्मक गोष्टींवर मात करण्यासाठी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आपल्याकडे सुरु झाली. नकारात्मकतेवर मात करुन पुढील वाटचालीसाठी शरीर व मन ताजे, टवटवीत, प्रसन्न करण्यासाठी अभ्यंगस्नान केले जाते.

अभ्यंगस्नाना संबंधित अशी आख्यायिका प्रचलित आहे की, नरकासुराच्या वधानंतर सत्यभामाने श्रीकृष्णाला पवित्र स्नान घातले.  नरकासुराविरुद्ध आपल्या विजय साजरा करण्यासाठी त्याने भाळी त्याचे रक्त लावले होते. त्यामुळे श्रीकृष्णाच्या कपाळावरील नरकासुराच्या रक्ताचे डाग पुसून टाकण्यासाठी हे अभ्यंगस्नान घालण्यात आलं होतं. तेव्हापासून अभ्यंगस्नानाची प्रथा सुरु झाली. याचाच अर्थ अभ्यंगस्नान म्हणजे शरीर आणि मनातून वाईट शक्ती, विचार दूर सारणे.