National Consumer Day: ग्राहक हा बाजारपेठेचा राजा समजला जातो. भारतात 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. इ. स. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक दिन' (National Consumer Day) म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न केले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. या हक्कांमध्ये ग्राहकांना एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना त्यांना कोणते अधिकार आणि हक्क आहेत याची माहिती देण्यात आली आहे.
खरं तर प्रत्येक ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी, असं ग्राहक चळवळीचे म्हणणे आहे. ग्राहकांनी नेहमी चिकित्सक असायला हवे. त्यामुळे आपली कोणीही फसवणूक करू शकणार नाही. आज संपूर्ण देशात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. याच दिवसाचे निमित्त साधून आपण ग्राहकांच्या हक्कांविषयी जाणून घेणार आहोत...(हेही वाचा - National Mathematics Day: भारतातील 'हे' 5 महान गणित तज्ञ तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या)
- सुरक्षेचा हक्क -
आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांची असते. आपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नसून त्या वस्तू सुरक्षितदेखील असायला हव्यात. वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचे चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात. तसेच या वस्तूंच्या वापरामुळे ग्राहकाला शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झाले तर कंपनीला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागते. हा ग्राहकांचा अतिशय महत्त्वाचा हक्क आहे.
- निवड करण्याचा अधिकार -
ग्राहकांना आपल्या आवडीच्या ब्रँडची किंवा आपल्याला जी वस्तू योग्य वाटेल ती विकत घेण्याचा अधिकार आहे. कोणताही दुकानदार तुमच्यावर एखादी विशिष्ट वस्तू विकत घेण्यास दबाव आणू शकत नाही. असं झाल्यास ते ग्राहकाच्या हक्काचे उल्लंघन समजले जाईल.
- माहितीचा हक्क -
ग्राहकांना कोणत्याही उत्पादनाबद्दल माहिती मिळवण्याचा हक्क आहे. या हक्काच्या माध्यमातून ग्राहक त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवू शकतो. तसेच ग्राहकांना एखादे उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्याविषयी पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही. विशेष म्हणजे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून पाहण्याचा हक्क आहे.
- तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क -
ग्राहकांना आपली फसवणूक झाली आहे, असं वाटतं असेल, तर त्याला त्याचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारने 'तक्रार निवारण केंद्र' आणि 'ग्राहक न्यायालयां'ची स्थापना केली आहे. तसेच ग्राहकांना आपली तक्रार मांडता यावी, यासाठी सरकारने ग्राहक मंचाची स्थापनाही केली आहे. येथे तुम्ही आपली तक्रार मांडू शकता. तसेच ग्राहकाची तक्रार रास्त असेल तर त्या तक्रारीचे निवारण केले जाईल.
- ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार -
अनेकदा ग्राहकांना आपल्या हक्काची माहिती नसते. त्यामुळे अनेक ग्राहकांची फसवणूक केली जाते. परंतु, सरकारने ग्राहकांना ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा हक्कदेखील दिली आहे. यासाठी सरकार नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. तसेच काही स्वयंसेवी संस्था शिबिरे किंवा कार्यशाळा घेत असतात.
ग्राहकांना वरील सर्व हक्काची जाणीव असणं गरजेचं आहे. अनेकदा ग्राहकांना आपल्या हक्काची माहिती नसल्याने दुकानदारांकडून त्यांची फसवणूक केली जाते. ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार निवारण केंद्र आहेत. परंतु, ग्राहकांना आपल्या हक्काची माहिती असल्यास प्रशासकीय यंत्रणेवरील तणाव कमी होऊ शकतो.