Children's Day 2019: दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बाल दिन (Bal Din) साजरा केला जातो, याच दिवशी 1889 मध्ये भारताचे सर्वात प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा जन्म झाला होता. लहान मुलांवरील नेहरूंचे प्रेम पाहता हा दिवस पुढे बाल दिन म्ह्णून साजरा केला जाऊ लागला. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टिकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यात बाल कल्याण उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. ''मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे'', अशी भूमिका मांडणारे नेहरू हे आजही चाचा नेहरू म्हणून सर्वत्र ओळखले जातात. यंदाच्या बालदिनाच्या निमित्ताने या दिवसाचे सुरुवात कशी व कधी झाली याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात..
बालदिनाचा इतिहास
1954 साली संयुक्त राष्ट्राने 20 नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली होती. असं असंल तरीही, जगातील विविध देशांमध्ये विविध तारखांना बालदिन पार पडतो. भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी आपल्याकडे हा दिवस बालदिन म्ह्णून साजरा केला जातो. नेहरूंना सुरुवातीपासूनच लहान मुलांच्या प्रति विशेष जिव्हाळा होता. ही बाब लक्षात घेता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना आदरांजली देण्याच्या हेतूने भारत सरकार कडून हा दिवस बाल दिन म्ह्णून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. 27 मे 1964 साली सर्वांनुमताने हा दिवस बाल दिन म्ह्णून घोषित करण्यात आला.
लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना बनवल्या होत्या. यासाठीच 'बाल दिन'च्या निमित्ताने विविध ठिकाणी लहानग्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभरातील अनेक शाळांमध्ये या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
या सगळ्याच्या पलीकडे देखील जाऊन विचार केल्यास बालदिनाच्या निमित्ताने वयाने प्रौढ असलेल्या पण मनाने बाल अशा मंडळींना देखील पुन्हा एकदा आपले बालपणीच्या आठवणीत रममाण होण्याची ही एक नामी संधी आहे. यंदा देखील ही संधी न दवडता आपल्यातील लहान मुलाला जागे करून धम्माल करायला विसरू नका.