Chaitra Navratri 2021 Ghatasthapana: हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढी पाडवा. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी मराठी बांधव दारामध्ये गुढी उभारत नव्या हिंदू वर्षाची सुरूवात करतात. पण नवीन शकसंवत्सराच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्र (Chaitra Navratri) देखील सुरू होते. चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी हे नऊ दिवस चैत्र नवरात्र साजरी करण्याची परंपरा आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीचा देखील विशेष थाट असतो. सवाष्ण महिला या नवरात्री मध्ये एकत्र जमतात, हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. हमखास आंबेडाळ आणि कैरीच्या पन्ह्याचे बेत करतात. मग यंदा चैत्र नवरात्रीची सुरूवात कधी आहे? तिथी प्रारंभ आणि समाप्तीची वेळ तसेच घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे? या तुमच्या मनातील सार्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी खालील माहिती नक्की वाचा.
यंदा 13 एप्रिल 2021 दिवशी चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. भारतीय सौर 23 चैत्र शके 1943, या नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे. चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली आणि या देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली. म्हणूणच दरवर्षी चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे करण्याची प्रथा रूढ झाली. चैत्र नवरात्रीमध्ये देखील पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याची प्रथा आहे. नक्की वाचा: Gudi Padwa 2021 Date: यंदा गुढीपाडवा कधी साजरा होणार? जाणून घ्या हिंदू नववर्षाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त.
चैत्र नवरात्री तारीख, तिथी आणि मुहूर्त
चैत्र नवरात्र यंदा 13 एप्रिल ते 21 एप्रिल 2021 दरम्यान साजरी केली जाणार आहे. 13 एप्रिल दिवशी घटस्थापना सकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी ते 10 वाजून 14 मिनिटांच्या काळात केली जाऊ शकते. तर दाते पंचांगानुसार, चैत्र प्रतिपदेची सुरूवात, 12 एप्रिलच्या दिवशी सकाळी 8 वाजून 02 मिनिटांनी होणार असून समाप्ती 13 एप्रिलला सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी आहे.
शारदीय नवरात्री प्रमाणे चैत्र नवरात्रीमध्येही काही घरांमध्ये या नऊ दिवसांत घट पुजला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला एका मातीच्या मडक्यात नऊ विविध धान्यांच्या बीया रूजवल्या जातात. विधिवत या नवरात्रीमध्ये या घटाची पूजा करून नवव्या दिवशी विसर्जन केले जाते.
(टीप: वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून लेटेस्टली त्यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.)