Bhagwan Gautam Buddha (Photo Credits: Pixabay)

यंदा 7  मे रोजी बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध (Gautam Buddha) यांची जयंती पार पडणार आहे, हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima)  म्हणून सुद्धा ओळखला जातो. भारतासह जगभरातील 180 देशात हा सोहळा बौद्ध धर्माचे अनुयायी अगदी निष्ठेने साजरा करतात. यंदाच्या या सणाच्या निमित्ताने आपण भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्माविषयीच्या व एकूणच आयुष्याविषयीच्या काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की कुणीही महापुरुष हा त्याच्या विचाराने ओळखला जातो, आणि त्याचे खरे अनुयायांनी हे त्या विचाराचे किती अवलंबन करतात यावरून पारखले जातात. त्यासाठी सर्वात आधी आपण ज्यांचे विचार आत्मसात करणार आहोत त्यांच्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. हीच माहिती आपण या लेकझांतून जाणून घेऊयात..

भगवान गौतम बुद्ध हे नाव कसे पडले?

शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. 563 मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला.या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते.

गौतम बुद्ध यांचा विवाह आणि गृहत्याग

सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला.या दोघांनी एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले.

सुखाचा संसार सुरु असताना, एके दिवशी सिद्धार्थला रस्त्यात एक भयंकर रोगाने गांजलेला माणूस दिसला. त्यानंतर एका वृद्ध माणसाचे दर्शन झाले आणि शेवटी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. ही सर्व दृश्य पाहून सिद्धार्थ मनातून व्यथित झाला. म्हातारपण आणि मृत्यू हे कोणालाही टाळता येत नाही याची त्याला जाणीव झाली आणि मग जीवनाचे ज्ञान करुन घेण्यासाठी तो 29 व्या वर्षी सर्व सुखाचा त्याग करुन तो गुपचूप वनात निघून गेला.

वयाच्या 35 व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. यापुढे ते बुद्ध म्ह्णून ओळखले जाऊ लागले.

धम्मचक्र परिवर्तन

गौतम बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः इ.स.पू. 6 व्या शतकामध्ये जवळजवळ 1 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

बुद्धांची शिकवण

गौतम बुद्धांनी दिलेल्या धर्माच्या बांधणीत, चार आर्यसत्य (दुःख, तृष्णा, दुःख निरोधम, प्रतिपद), पंचशील, अष्टांगिक मार्ग, परिमिता, या मुद्द्यांची जोड दिली होती. जीवनाचे योग्य ज्ञान, सकर्मे करण्याचा निश्चय, मृदू बोलणे, चांगले आचरण, मनाची शांती ढळू न देणे, प्रयत्न व योग्य विचार या मार्गच मनुष्य जीवन सुखद होईल असा त्यांचा विश्वास होता.

महापरिनिर्वाण

इ.स.पू. 483 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. उत्तर प्रदेशचा कुशीनगर येथे बुद्धांनी परिनिर्वाण प्राप्त केले, त्यामुळे कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते.

भारताशिवाय जगभरात बौद्ध धर्माचे अनेक उपासक आहेत. त्यांच्या शिकवणीला, विचारांना, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी 'बौद्ध पौर्णिमा' साजरी केली जाते. बुद्धांचे विचार आत्मसात करून त्यांच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने वंदन करण्यासाठी हा दिवस एक सुरुवात आहे.