Bail Pola 2019: बैल पोळा सण महाराष्ट्रात श्रावण अमावस्या दिवशी साजरा करण्याचं महत्त्व काय? जाणून घ्या पूजा विधी आणि परंपरा
Pola 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

सण उत्सवाचा, व्रत वैकल्यांचा महिना म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सांगता पिठोरी अमावास्येने  (Pithori Amavasya) होते. हिंदू कालदर्शिकेनुसार, यंदा गुरुवार, 30 ऑगस्ट रोजी अमावस्या सुरु होणार आहे. पिठोरी अमावस्या ही महाराष्ट्रातील अनेक भागात बैल पोळा (Bail Pola)  सणाच्या स्वरूपात साजरी केली जाते. वास्तविक आषाढ, श्रावण आणि भाद्रपद अशा तीन ही महिन्यात बैल पोळा साजरा करण्याची परंपरा आहे, विविध प्रांतवार या सणाला बेंदूर, पोळा आणि नंदी पोळा अशी नावे पडली आहेत.मुळात शेतकरी बांधवांसाठी खास असणारा हा सण विदर्भात तुलनेने अधिक उत्साहात पार पडतो. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाच्या पाठीचा कणा म्हणजे बैल, या खास दिवशी बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो. चला तर मग याच निमित्ताने बैल पोळा सणाचे महत्व आणि स्वरूप थोडक्यात जाणून घेउयात..

बैलपोळा महत्व

भारत हा मुळातच कृषीप्रधान देश म्ह्णून ओळखली जातो. आपल्याकडील तब्बल 80  टक्के जनता ही खेड्यात राहते, निसर्गाचा खरा वरदहस्त असलेल्या गावाकडील भागात शेती हा मुख्य व्यवसाय म्ह्णून ओळखला जातो. दिवसरात्र मेहनत करून हा शेतकरी जगाचा पोशिंदा बनतो, या पोशिंद्याचा साथीदार म्हणजे त्याचा बैल. शेत नांगरणीपासून धान्याच्या मळवणी पर्यंत हा मुका जीव राबत असतो. आपल्या बळीराजाला बळ देत असतो.पण त्याचे हे योगदान कधीच अधोरेखित होत नाही. त्यामुळे मग सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते. (Bail Pola 2019 HD Images & Wallpapers: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा देणारी HD Images, Greetings शेअर करून साजरा बळीराजाचा सण!)

कसा साजरा होतो बैलपोळा

या दिवशी प्रथम बैलांना नदी किंवा पाणवठ्याच्या ठिकाणी नेऊन अंघोळ घालतात त्यांच्या खांद्यांना तुपाने रगडले जाते. यानंतर बैल सजवण्यास सुरुवात होते. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार बैलाच्या अंगावर शाल झालरीं टाकतात, बैलाची शिंगे रंगवतात. गळ्यात सुताच्या माळा घालून पायात घुंगरू बांधतात.ही सजावट झाली कि साधारण दुपारपर्यंत बैलाला घरी आणले जाते, इथे सुरुवातीला शेतकऱ्याची कारभारीण बैलाची पूजा करते आणि एखाद्या पाहुण्याप्रमाणे मनोभावे त्याची सेवा केली जाते. या दिवशी बैलाला गोडा धोडाचा नैवद्य म्हणून मांडे किंवा पुरणपोळी बनवली जाते. ज्यांच्यापाशी बैल किंवा शेती नाहीत ते मातीच्या बैलाची पूजा करतात. यानंतर संध्यकाळी गावागावात बैलांच्या मिरवणूक निघतात. सगळ्यात वयस्कर बैलाला आंब्याच्या पानांचा मुकुट चढवला जातो, बैलपोळ्याची गाणी म्हणत मग संपूर्ण गावात नाचत बैल फिरवले जातात. काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो.

भारतीय सण उत्सव हे सर्वसमावेशक संस्कृतीचे खरे दर्शन घडवतात. प्राण्याला सुद्धा देवाप्रमाणे मान देणे याहून मोठा कृतज्ञ भाव सापडणार नाही. बैलपोळा हे निश्चितच या भावाचे समर्पक उदाहरण आहे