
Ashadhi Ekadashi 2021 Date: महाराष्ट्रात 'आषाढी एकादशी'ला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने निघणाऱ्या 'पंढरपूर वारी'ला मोठी परंपरा आहे. आषाढी एकादशीला 'महाएकादशी' असेही म्हणतात. आषाढी एकादशी हे विष्णू देवतेचे व्रत आहे. या दिवशी विष्णू रुपी विठ्ठालाची पूजा-पार्थना केली जाते. यंदा आषाढी एकादशी मंगळवार, 20 जुलै रोजी आहे. या निमित्ताने राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरची चालत वारी करतात. मात्र हा मोठा सोहळा यंदाही कोविड-19 संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. (संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)
वर्षभरात येणाऱ्या एकादश्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशा महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. या एकादशीला देव झोपतात. म्हणून या एकादशीला 'देवशयनी एकादशी' असेही म्हटले जाते. चातुर्मासात देव झोपलेले असल्यामुळे माणसाने स्वत:च्या संरक्षणासाठी या काळात व्रतं, उपवास, भजन-कीर्तन करण्याची पद्धत पाडली असावी. त्याचबरोबर या काळात पावसाळा असल्याने आरोग्याच्या दृष्टीने बेताने आहार घेणे केव्हाही उत्तमच. म्हणूनच पचायला जड असे पदार्थ टाळून उपवासाची परंपरा पडली असावी.
संत तुकाराम, नामदेव, जनाबाई, ज्ञानेश्वर सर्वांनी ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग सांगितला. तो म्हणजे नामस्मरण. दैनंदिन काम करताना मुखाने पांडुरंगाचे नाव घ्यावे, अशी शिकवण संतांनी जनमानसांत रुजवली आणि विठ्ठलभक्तीची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली. तसंच समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतं. यास 'पंढरीची वारी' असं म्हटलं जातं. यात सामिल होणारे सगळे 'वारकरी'.
आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणांहून संतांच्या पालख्या घेऊन वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात. हातात टाळ, मृदंग, खाद्यांवर भगवी पताका, डोक्यावर तुळस अशा वेशात सर्व भेदभाव विसरुन वारकरी वारीत सामिल होतात. मुखाने विठुरायाचा गजर सुरुच असतो. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता होते. या दिवशी अवघ्या महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो.