कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी (Ashadi Wari) पार पडणार आहे. यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत संतांचे पालखी प्रस्थान सोहळे रंगणार आहेत. आजपासून पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होत असून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रातिनिधिक स्वरुपात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याचबरोबर पैठणहून संत एकनाथ यांची पालखी देखील निघणार आहे. उद्या ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. दरम्यान, पालखी प्रस्थान सोहळा नेमका कसा असेल आणि त्या दरम्यान कोणते कार्यक्रम पार पडतील, हे जाणून घेऊया. पहा संपूर्ण वेळापत्रक.... (Pandharpur Ashadi Wari 2021: संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला 350 वारकऱ्यांना परवानगी)
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा:
आज दुपारी 2 वाजता संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रत्यक्ष सोहळ्याला सुरुवात होईल. हा सोहळा 1 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 पर्यंत असेल. त्यादरम्यान होणारे दररोज कार्यक्रम:
# पहाटे 4 ते 6 सर्व देवांची नित्य पूजा.
# सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत पालखी सोहळा वाटचालीचे कार्यक्रम.
# सायंकाळी 6 वाजता समाज आरती.
# सायंकाळी 9 ते 11 कीर्तन सेवा.
# सायंकाळी 11 नंतर शेज आरती.
19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पादुका बसने पंढरपूरकडे रवाना होतील. 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहील.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा:
उद्या, 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. कसा असेल 2 ते 24 जुलै पर्यंतचा कार्यक्रम?
# पहाटे 4 ते 5.30 : घंटानाद, काकड, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती
# सकाळी 9 ते 11 : वीणा मंडपात कीर्तन
# दुपारी 12 ते 12.30 : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य
# सायंकाळी 4 : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ
# सायंकाळी 6 : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी
# प्रस्थानानंतर 3 ते 19 जुलै दरम्यान आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार.
त्यानंतर 19 जुलै रोजी माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील. 19 ते 24 जुलै दरम्यान माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्येच असतील. 24 जुलै रोजी पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून एसटी बसने आळंदीकडे परत आणल्या जातील.