मागील वर्षी प्रमाणे यंदाही पंढरपूरच्या आषाढी वारीवर (Pandharpur Ashadi Wari) कोविड-19 (Covid-19) चे सावट आहे. त्यामुळे विविध नियम, वारकऱ्यांची मर्यादीत संख्या या आधारावर वारीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र आता यात बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, आज देहू मधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आणि औरंगाबाद मधील पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी पूर्वी केवळ 100 भाविकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 350 वारकऱ्यांना हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल (30 जून) हा आदेश जारी करण्यात आला.
त्याचबरोबर 2 जुलै रोजी प्रस्थान होणाऱ्या ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला देखील 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठी देखील 100 भाविकांना परवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आषाढी वारीसाठी तुकाराम महाराज यांची पालखी आज प्रस्थान करणार असून कडक निर्बंधामध्ये हा सोहळा पार पडेल. आज दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. हा सोहळा प्रातिनिधिक स्वरुपात असणार असून त्यानंतर 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील. (आषाढी वारी दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये 17-25 जुलै दरम्यान संचारबंदी; सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी)
उद्या पैठण मधून संत एकनाथ महाराज यांची पालखी प्रस्थान करणार आहे. हा सोहळा दुपारी 12.30 वाजता सुरु होईल. हे प्रस्थान प्रातिनिधिक स्वरुपात असल्याने पालखी जुन्या वाड्यातून समाधी मंदिरापर्यंत जाईल. त्यानंतर पालखीचं 19 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने एसटीने प्रस्थान करेल.
दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, रुक्मिणी माता, संत निळोबाराय आणि संत चंगतेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा त्यात समावेश आहे.