Curfew In Pandharpur: आषाढी वारी दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये 17-25 जुलै दरम्यान संचारबंदी; सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी
विठ्ठल मंदिर पंढरपूर (Photo credit : Youtube)

यंदाच्या वर्षी देखील आषाढी वारी (Ashadhi Vari) वर कोरोनाचं संकट कायम आहे. कोविड19 चा धोका लक्षात घेता यावर्षी देखील पायी वारी रद्द करत पालख्या बसने रवाना करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता आषाढी वारी दरम्यान पंढरपूरात संचारबंदी (Curfew In Pandharpur) करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान तसे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. ही संचारबंदी 17-25 जुलै दरम्यान 9 दिवसांची राहणार आहे. वारकर्‍यांसाठी पवित्र आणि श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा परिसरातही या काळामध्ये कलम 144लागू असेल तर सोलापूर जिल्ह्याला त्रिस्तरीय नाकाबंदी असणार आहे. नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीनिमित्त यंदाही राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा होणार एसटी बसमधून प्रवास, 19 जुलैला प्रस्थान- मंत्री अनिल परब.

दरवर्षी प्रमाणे विठ्ठल रूक्मिणीची आषाढी एकादशी निमित्त शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे मंदिरात मानकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला अशा मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाईल तर पालख्या घेऊन येणार्‍यांमध्येही मंदिरात केवळ 5 जणांना प्रवेशाची मुभा असणार आहे.

यंदा आषाढी एकादशी 20 जुलै दिवशी आहे. या निमित्त महिना -दीड महिना आधीपासून राज्याच्या विविध भागातून वारकरी आणि पालख्या पंढरपूराकडे कूच करतात. पायी दिंडी सोबत चालण्याचा अनुभव विलक्षण असतो पण यंदा सलग दुसर्‍या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आषाढी वारी रद्द झाली असून भाविकांनाही मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. पण देशा-परदेशातून या काळात विठ्ठल रूक्मिणीचं 24 तास ऑनलाईन दर्शन घेण्याची सोय मात्र खुली ठेवली जाणार आहे.