आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंब-या, पोवाडा, लावण्या ,वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. त्यांचे माहात्म्य शब्दात मांडता येणार नाही असेच आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अशिक्षित असणा-या अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe Death Anniversary) यांनी आपल्या साहित्यातून आपली एक वेगळीच छाप लोकांसमोर पाडली. तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला. त्यांचा जीवनप्रवास खूपच रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. अशिक्षित असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास खरच वाखाणण्याजोगा आहे.
लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा याचा देखील समावेश आहे. या कादंबरीला इ.स. 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह 15 आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अन्य भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली आहेत.
साहित्यासोबत बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमान पात्रातून अनेक लेख व पुस्तकांची परीक्षणे लिहिली.
अण्णाभाऊंच्या शेवटच्या काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठानकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. अखेर 18 जुलै 1969 रोजी गोरेगावच्या सिध्दार्थनगरात त्याचं निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अशा महान लोकशाहीरांना विनम्र अभिवादन!