अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2020) हा हिंदू सणांमधील एक महत्वाचा सण आहे, या दिवसाला साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. यंदा रविवार 26 एप्रिल रोजी हा मुहूर्त आहे. या सणाच्या निमित्ताने अनेक योग्य एकत्र जुळून येतात. याच दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम (Parshuram Jayanti) , बसवेश्वर जयंती (Basveshwar Jayanti) आणि, हयग्रीव जयंती असते. तसेच महर्षी व्यास (Maharshi Vyas) यांनी लेखनिक गणपतीच्या (Ganpati) सोबत महाभारत (Mahabharat) ग्रंथाची रचना करायला सुद्धा याच दिवशी प्रारंभ केला असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी हिंदू धर्मियांकडून हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा विविध प्रांतात हा सण साजरा करण्याच्या विविध पद्धती आहेत.
अनेकठिकाणी या निमित्ताने उत्सव सोहळे सुद्धा पार पडतात, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे उत्सव मोठ्या प्रमाणात पार पडणार नाहीत मात्र प्रत्येकाला घरी आपापल्या श्रद्धेनुसार पूजाविधी करू शकते. दरम्यान विविध राज्यातील अक्षय्य तृतीया साजरा करण्याच्या पद्धती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Akshaya Tritiya 2020: यंदा 26 एप्रिल रोजी साजरी करा अक्षय्य तृतीया; जाणून घ्या या सणाचे महत्त्व
भारतातील विविध भागात कशी साजरी होते अक्षय्य तृतीया?
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील कोकण भागात हा सण शेतीसाठी महत्वाचा मानला जातो, पावसाळा सुरु होण्याच्या आधी मशागत पूर्ण केलेल्या शेतजमिनीत बियाणे पेरण्याचे काम या दिवसापासून केले जाते. या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून अक्षय्य म्हणजेच कधीही न संपणारे धान्य पिकते व अशी समजूत आहे. याच विचारातुन औषधी वनस्पती, फळबाग यांची देखील रोपे लावली जातात. चैत्रगौरीच्या व्रताच्या उद्यापनाचा हा दिवस असतो त्यामुळे या दिवशी महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम सुद्धा पार पडतात.
उत्तर भारत
उत्तरेकडे या सणाच्या निमित्ताने परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो.गंगेत स्नान करणे, यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू व समिधा देणे,असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.
ओरिसा
या प्रांतात सुद्धा शेतकरी वर्गासाठी हा सण विशेष आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. तसेच जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ सुद्धा दरवर्षी या दिवशी होतो.
दक्षिण भारत
दक्षिणेतील राज्यात महाविष्णु आणि लक्ष्मी व कुबेर पूजन या दिवशी केले जाते. या पूजेनंतर अन्नदानाला विशेष महत्व आहे.
पश्चिम बंगाल
या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.
राजस्थान
राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात. हा आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.
अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. तर उत्तर भारतातील लोक या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानतात.