Ahilyabai Holkar| Photo Credits: wikipedia

महाराष्ट्रात कुशल प्रशासकांच्या यादीमध्ये जशी पुरूषांची यादी आहे तशीच अनेक स्त्रियांनी देखील आपली हुकूमत दाखवली आहे. महाराष्ट्रात पितृसत्ताक संस्कृतीला आव्हान देणार्‍यांपैकी एक नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar). यंदा अहिल्याबाईंची 296 वी जयंती  Ahilyabai Holkar Jayanti) आहे. दरवर्षी महाराष्ट्रात अहिल्याबाईंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पण यावर्षी देखील राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता त्याच्या सेलिब्रेशनवर बंधनं आहेत. पण घरातच अहिल्याबाईंच्या प्रतिमेचं पूजन करून हा दिवस साजरा केला जाणार आहे. तरूण मंडळी, महिलांसाठी अहिल्याबाईचं जीवन ही एक प्रेरणा आहे. अनेक परंपरागत चालत आलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत त्यांनी समाजात सजगता निर्माण करण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडली आहे. दरम्यान इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. मग जाणून अशा या मराठी कन्येचा प्रशासकीय क्षेत्र, समाजिक क्षेत्र यामधील योगदानाबाबतच्या खास गोष्टी.

अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्याकाळी स्त्री शिक्षणाबाबत जनजागृती नव्हती पण अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिखाण, वाचन शिकवले होते. वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाई मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई झाल्या. त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला होता. पण 1754 मध्ये एका लढाईत खंडेराव धारातिर्थी पडले आणि अहिल्याबाई विधवा झाल्या. पण खंबीर मल्हारराव यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ न देता पुढे मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार पाहण्यास दिला. नंतर अहिल्याबाईंनी 1795 पर्यंत माळव्यावर राज्य केलं.

अहिल्याबाई न्यायदानासाठी विशेष ओळखल्या जातात. सार्‍यांना समान न्याय मिळेल यासाठी त्या विशेष लक्ष देत होत्या. एकदा संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्यालाही तुरुंगात डांबण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. अहिल्याबाईंचे राज्य हे कायद्याचे राज्य होते त्यामुळे जनता समधानी होती. कदाचित म्हणून पुढे त्यांना संताच्या दर्जाप्रमाणे पुजलं जाऊ लागलं.

अहिल्याबाईंनी अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. धर्मशाळा बांधल्या पण त्यांनी तितक्याच खंबीरपणे अनिष्ट प्रथा, परंपरांना विरोध देखील केला. त्यापैकी एक सती परंपरा होती. अंधश्रद्धा निवारण्यासाठी त्या स्वतः पुढे आल्या होत्या.

इंदौर मधील महेश्वर ही अहिल्याबाईंनी आपली राजधानी बनवल्यानंतर तेथे शाळा सुरू करून विद्या प्रसाराचे काम सुरू केले. विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. तसेच त्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.

अहिल्याबाई होळकर या 70 व्या वर्षी मृत्यू पावल्या. पण त्यांच्या कामाचा ठसा आजही मराठी मनात मनात उर्जा निर्माण करण्याचं काम करत आहे.