जागतिक मधुमेह दिन (Photo Credits: Pixabay)

जगात दर पाच सेकंदाला मधुमेहाचा एक नवीन रुग्ण सापडतो. भारतीय समाजातही आज एकीकडे तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे आणि दुसरीकडे आपण खालावत चाललेल्या जीवनशैलीमुळे आजारांचे बळी पडत आहोत. म्हणूनच मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या बनला आहे. जगात मधुमेहींच्यागणनेमध्ये भारताचा दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब बनली आहे. 14 नोव्हेंबरला संपूर्ण जगात जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. त्यामुळे मधुमेह या आजाराबद्दल घेतलेला हा आढावा.

मधुमेह या आजाराला गावाकडे साखऱ्या रोगही म्हणतात. जेव्हा स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होण्याचे कार्य मंदावते किंवा इन्सुलिनचा रक्तशर्करेवरचा प्रभाव कमी होतो, तेव्हा आपल्या रक्तातली साखरेची पातळी सुरक्षित मर्यादेच्या बाहेर जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह होय.

लक्षणे –

मधुमेहाची वेगळी अशी कोणती लक्षणे नाहीत मात्र,  सातत्याने लघवीची भावना होणे, नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे, अचानकपणे वजन घटणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टीमध्ये लक्षणीय बदल, हात किंवा पायांत सतत चमकल्यासारखे किंवा गुदगुल्यांची भावना होणे, बरेचदा थकल्यासारखे वाटणे, त्वचा एकदम कोरडी होणे, जखमा बर्‍या होण्यास वेळ लागणे, नेहमीपेक्षा अधिक वेळा संसर्ग होणे ही मधुमेहाची काही ठळक लक्षणे आहेत.

मधुमेह टाळण्याकरता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. खूप गोड खाल्ले की मधुमेह होतो हा चुकीचा समज आहे. गोड खाऊन मधुमेह होत नाही- पण खूप गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढते, पोटावरची चरबी (abdominal fat) वाढते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. मधुमेह टाळण्याचा सोपा उपाय आहे की ‘पोटभर खाऊ नका व पोट रिकामे ठेवू नका’! मधुमेह झाला म्हणून घाबरुन न जाता त्याचा सामना केला पाहिजे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून वेळच्या वेळी तपासण्या, जीवनशैलीमध्ये बदल त्याचबरोबर धावणे, चालणे, सायकलिंग यांसारखे व्यायाम नियमित करुन या मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय -

> रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 2-3 तुळशीची पाने किंवा एक टेबलस्पून तुळशीच्या पानांचा रस प्यावा.

> एक ग्लास कोमट पाण्यात एक टेबलस्पून अळशीची पूड घालून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. 2 टेबलस्पूनपेक्षा जास्त पूड खाणे शरीरासाठी हानिकारक असते. (अळशीच्या बिया खाल्याने जेवणानंतरच्या शर्करेची पातळी जवळपास 28% पर्यंत कमी होते.)

> एक महिनाभर दररोजच्या आहारात 1 ग्रॅम दालचिनीचा समावेश केल्यास रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

> गरम पाण्यामध्ये ग्रीन टीची बॅग 2-3 मिनिटे बुडवून ठेवा. टी बॅग काढून चहा प्या. ग्रीन टी तुम्ही सकाळी किंवा जेवणानंतर घेऊ शकता. (ग्रीनटी मधील पॉलिफिनॉलमधील अँटिऑक्सिडंट आणि हायपोग्लेसिमिक गुणधर्मांमुळे रक्तातील शर्करा नियंत्रित राहण्यास मदत होते.)

> शेवग्याची काही पाने धुवून त्यांचा रस काढावा. हा रस दररोज सकाळी रिकाम्यापोटी ¼ कप घ्यावा. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

> आठवड्यातून किमान एकदा कारल्याची भाजी खावी. लवकरात लवकर शर्करा नियंत्रणात आणण्यासाठी एक एक ग्लास कारल्याचा रस तीन दिवस रिकाम्या पोटी घ्यावा.

> जांभळामध्ये ग्लायकोसाइड हा घटक असल्यामुळे जांभळाच्या बिया स्टार्चचे शर्करेत रुपांतर होऊ देत नाहीत. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी 5-6 जांभळे खावीत किंवा कोमट दूध/पाण्यात एक चमचा जांभळाच्या बियांची पूड मिसळून दररोज प्यावे.

आशियाई देशांमध्ये फारच कमी वयात मधुमेह होतो. फिनलंड व दक्षिण कोरिया या देशांनी मधुमेह आणि हृदयविकार या आजाराचे प्रमाण कमी करण्याची उत्तम कामगिरी बजावली आहे. नियमित व्यायामाला योग्य आहाराची जोड दिली तर हे शक्य आहे. त्याचबरोबर मन शांत ठेवणे व त्यासाठी मानसिक तणाव कमी करणे यासाठी योग किंवा ध्यानधारणाही आवश्यक आहे.