Makar Sankranti 2019 : इच्छामरणाचा वर असलेल्या भीष्मांनी संक्रांतीला केला होता प्राणत्याग; जाणून घ्या काय होते कारण
भीष्म (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या तिळगुळ, पतंग, वाणाचे साहित्य अशा अनेक गोष्टींनी बाजार फुलले आहेत. 15 जानेवारीला वर्षातील पहिला सण मकर संक्रांती साजरा (Makar Sankranti) केली जाईल. संक्रांतीचा काळ हा दानधर्मासाठी पुण्यकाळ मानला जातो. एकमेकांमधील दुरावा नष्ट करून नात्यात गोडवा आणण्याचा हा सण. संक्रांत साजरी करण्यामागे अनेक कारणे आहेत. देवीने याच दिवशी संकरासुर राक्षसाचा वध केला होता. यासोबतच महाभारतामध्ये एक महत्वाची घटना संक्रांतीच्या दिवशी घडली होती, ती म्हणजे याच दिवशी पितामह भीष्मांनी आपला देह ठेवला होता. बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांनी देहत्यागासाठी संक्रांतीचा म्हणजेच उत्तरायणाचा दिवस निवडला होता.

हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनू व गंगा यांचा हा पुत्र देवव्रत, हेच भीष्मांचे खरे नाव. पुढे शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून याने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना 'भीषण' या अर्थाचे 'भीष्म' हे नाव कायमचे प्राप्त झाले. त्यांच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणाचा वर दिला. महाभारतीय युद्धात भीष्मांनी सेनापती म्हणून कौरवपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व केले. सशस्त्र पुरुषाशिवाय अन्य कुणाविरुद्ध शस्त्र न धरण्याची भीष्मांची नीती होती. हे ठाऊक असल्याने अर्जुनाने शिखंडीस पुढे घालून युद्धात याच्यावर शरवर्षाव केला. बाणांच्या शय्येवर पडल्यावर भीष्मांचे शीर पूर्वेकडे होते. हीच ती वेळ होती, यावेळी दक्षिणायन चालू असल्याचे भीष्मांच्या धान्यात आले. बाणांनी घायाळ झालेल्या अवस्थेत भीष्मांनी तब्बल 58 दिवस आपले प्राण रोखून धरले. शेवटी सूर्य जेव्हा संक्रमण करत मकर राशीत आला, तेव्हा उत्तरायण सुरु झाले आणि 58 दिवसांनी रणांगणावर भीष्मांनी आपला प्राणत्याग केला, आणि मोक्ष प्राप्त करून घेतला. हाच दिवस होता मकर संक्रांतीचा दिवस. (हेही वाचा : जाणून घ्या यंदाची संक्रांत वेळ आणि महत्व)

मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानालाही फार महत्व आहे, असे सांगितले जाते की, गंगा मकर संक्रतीच्याच दिवशी भगीरथाच्या मागे चालत, कपिल ऋषींच्या आश्रमातून पुढे जाऊन सागराला मिळाली होती. दरम्यान यावर्षी सूर्य 14 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटाला मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे यावर्षी 15 तारखेला मकर संक्रांती साजरी केली जाईल.