Tiger प्रतिकात्मक फोटो (PC - Pixabay)

Panna Tiger Death: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पन्ना येथे एका प्रौढ तरुण वाघाचा (Tiger) झाडाच्या फासात लटकून संशयास्पद मृत्यू झाला आहे. फास बसल्याने वाघाचा मृत्यू झाल्याची देशातील ही पहिलीच घटना असेल. या घटनेला दुजोरा देताना पन्ना व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणाले की, वाघाचा मृतदेह क्लच वायरला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वाघाचे शव अत्यंत वाईट अवस्थेत सापडले असून त्याला दुर्गंधीही येत होती.

पाच ते सहा दिवसांपूर्वी वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभाग आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास केला. पन्ना येथे एका तरुण वाघाचा झाडाला लटकून संशयास्पद मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा -Tiger 'Waghdoh' Dies of Old Age: महाराष्ट्रातील सर्वात वृद्ध वाघ 'वाघडोह' याचा वृद्धापकाळाने मृत्यू)

वाघाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी श्वानपथकाने घटनास्थळी शोध घेतला. मात्र बेकायदेशीर कृत्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या वाघाच्या अंगावर ओरखडे आणि संघर्षाच्या खुणा आढळल्या असून, त्यावरून असे वाटते की, दोन वाघांमध्ये आपसात भांडण झाले असावे आणि त्यात एकाचा मृत्यू झाला असावा. वाघाचा मृत्यू तीन ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोस्टमॉर्टमनंतर मृत वाघाचा मृतदेह जाळण्यात आला. वाघाच्या मृत्यूच्या घटना घडल्याने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (हेही वाचा - Tiger Kills Man in Chandrapur: नागभीड वन परिक्षेत्रातील पान्होडी गावात 65 वर्षीय व्यक्तीवर वाघाचा हल्ला; विद्रुप अवस्थेत सापडला मृतदेह)

इंडियन टायगर एस्टिमेशन रिपोर्ट 2018 नुसार, देशात सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशात आढळतात. मध्य प्रदेशात वाघांची संख्या 526 आहे. मात्र, काही काळापासून वाघांच्या मृत्यूच्या बातम्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मध्य प्रदेशात कान्हा, बांधवगड, सातपुडा, पेंच आणि संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पांसह अनेक व्याघ्र प्रकल्प आहेत. या घटनेपूर्वी 9 नोव्हेंबरला वाघिणीचाही मृत्यू झाला होता.