तहसीलच्या नागभीड वन परिक्षेत्रांतर्गत (Nagbhid Forest) पान्होडी गावात (Panhodi village) शेळ्या चरायला आणलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (17 ऑक्टोबर) दिवशी सकाळी 9.30 च्या सुमारास घडलेली आहे. जेव्हा हा माणूस मच्छली बीटच्या (Machali beat) खाली कंपार्टमेंट क्रमांक 669 मध्ये त्याची गुरे चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता तेव्हा हा हल्ला झाल्याचं टाईम्स ऑफ इंडिया च्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.
65 वर्षीय सत्यवान मेश्राम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते पान्होडी गावात राहत असे. सकाळी 9.30 च्या वेळेस जेव्हा ते जंगलात गेले तेव्हा वाघ देखील भक्ष्याच्या शोधात होता. वाघाने सत्यवान यांच्यावर झडप घालत त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सत्यवान यांचा जीव गेला. वनविभागाने या घटनेची दखल घेतलेली आहे. सत्यवान यांचा मृतदेह पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आला.
सत्यवान मेश्राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला तातडीने 25 हजारांची मदत करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात अशाप्रकारे वाघाच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाल्याची ही 27 वी मानवी मृत्यूची घटना आहे. यामध्ये 22 जणांवर वाघाने हल्ला केला आहे तर 5 जण बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यूमुखी पडले आहेत.
ब्रम्हपुरी वनविभागाच्या अधिकार्यांनी वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की जवळपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना परिसरात वाघाच्या हालचालीचा इशारा देण्यात आला आहे आणि शेतात किंवा जंगलात जाताना खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात आली आहे.