Prime Minister Narendra Modi (PC - ANI)

Biotech Startup Expo: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील पहिल्या बायोटेक स्टार्टअप एक्स्पो 2022 चे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान हे देखील उपस्थित होते. उद्घाटनानंतर पीएम मोदींनीही भाषण केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील पहिला बायोटेक स्टार्टअप एक्स्पो हा देशातील बायोटेक क्षेत्राच्या व्यापक विकासाचे प्रतिबिंब आहे. भारताची जैव-अर्थव्यवस्था गेल्या आठ वर्षांत आठ पटीने वाढली आहे.

भारत बायोटेक लवकरच ग्लोबल इकोसिस्टममधील टॉप टेन राष्ट्रांच्या लीगमध्ये सामील होणार आहे. बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) ने न्यू इंडियाच्या या नव्या झेपमध्ये मोठी भूमिका बजावली आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा, सबा नकवी आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरोधात सोशल मीडियावर द्वेष पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल)

यावेळी पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारत हा बायोटेक क्षेत्रातील संधींचा देश मानला जात आहे. याची प्रामुख्याने पाच कारणे आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण लोकसंख्या, वैविध्यपूर्ण हवामान क्षेत्र, प्रतिभावान मानवी भांडवल, व्यवसाय सुलभतेसाठी केलेले प्रयत्न आणि जैव-उत्पादनांची मागणी यांचा समावेश आहे.

गेल्या 8 वर्षांत, आपल्या देशातील स्टार्ट-अपची संख्या सुमारे 60 विविध उद्योगांमध्ये 70,000 पर्यंत वाढली आहे. यापैकी 5,000 हून अधिक स्टार्ट-अप बायोटेक क्षेत्राशी संबंधित आहेत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

बायोटेक स्टार्टअप एक्स्पोचा उद्देश काय? जाणून घ्या

बायोटेक स्टार्टअपचे आयोजन बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल, जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे केले जाते. 'बायोटेक स्टार्टअप इनोव्हेशन: आत्मनिर्भर भारताच्या दिशेने' ही एक्स्पोची थीम आहे. दोन दिवसीय कार्यक्रम 10 जून रोजी संपणार आहे. हे एक्स्पो उद्योजक, गुंतवणूकदार, शास्त्रज्ञ, संशोधक, उत्पादक आणि सरकारी अधिकारी यांना जोडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.