PM Modi Inaugurates FM Transmitters: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज 91 नवीन 100 व्हॅट एफएम ट्रान्समीटर्सचे (FM Transmitters) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यामुळे देशातील रेडिओ संपर्क व्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे. पंतप्रधानांनी उपस्थितांना यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित पद्म पुरस्कार विजेत्यांचेही त्यांनी स्वागत केले. आकाशवाणीने केलेले हे एफएम विस्तारीकरण त्याच्या देशव्यापी एफएम होण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आकाशवाणीने सुरु केलेले हे नवीन 91 एफएम ट्रान्समीटर्स 85 जिल्हे आणि देशातील 2 कोटी लोकांसाठी भेटवस्तू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एक प्रकारे, हे भारतातील विविधता आणि त्यांच्या नाना रंगांची झलक देते, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन 91 एफएम ट्रान्समीटर्स अंतर्गत समाविष्ट असलेले जिल्हे हे आकांक्षीत जिल्हे आणि विभाग आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आकाशवाणीचे अभिनंदनही केले. याचा मोठा लाभ होणार असलेल्या ईशान्य भारतातील नागरिकांचेही त्यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी त्यांच्या पिढीचे रेडिओशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. “मन की बात’च्या आगामी 100 व्या भागाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, “माझ्यासाठी, ही आणखी आनंदाची बाब आहे की, माझा एक "कार्यक्रम सादरकर्ता" म्हणूनही रेडिओशी संबंध आहे.” "देशवासीयांशी अशा प्रकारचा भावनिक संबंध केवळ रेडिओद्वारेच शक्य झाला. याद्वारे मी देशाच्या सामर्थ्याशी आणि देशवासियांमधील कर्तव्याच्या सामूहिक शक्तीशी जोडलेला राहिलो. मन की बातच्या माध्यमातून लोकचळवळ बनलेल्या स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि हर घर तिरंगा यांसारख्या उपक्रमाबाबत कार्यक्रमाच्या भूमिकेची उदाहरणे देऊन त्यांनी हा मुद्दा विशद केला.“ एक प्रकारे, मी तुमच्या आकाशवाणी संचाचा भाग आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले. (हेही वाचा -Insurance Scam in Union Territory: केंद्रशासित प्रदेशातील कथित विमा घोटाळ्याची चौकशी; सीबीआयचे पथक सत्यपाल मलिक यांच्या निवास्थानी दाखल)
या सुविधेपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्यांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरणच हे नवीन 91 एफएम ट्रान्समीटर्स पुढे नेत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "लांब आहेत असे मानल्या जाणाऱ्यांना आता मोठ्या स्तरावर जोडले जाण्याची संधी मिळेल" असे पंतप्रधान म्हणाले. एफएम ट्रान्समिटर्सच्या फायद्यांची यादीच त्यांनी सांगितली. महत्त्वाची माहिती वेळेवर प्रसारित करणे, समुदाय उभारणीचे प्रयत्न, शेती संबंधित हवामानाची ताजी माहिती, शेतकऱ्यांसाठी अन्न आणि भाजीपाल्यांच्या किमतींची माहिती, रसायनांच्या वापरामुळे होणारे शेतीचे नुकसान याबाबत चर्चा, शेतीसाठी प्रगत यंत्रसामग्री एकत्र करणे, महिला बचत गटांना नवीन बाजार पद्धतींबद्दल माहिती देणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपूर्ण समुदायाला मदत करणे यासह त्यांनी एफएमच्या माहितीपूर्ण मनोरंजन मूल्याचाही उल्लेख केला.
सरकार, तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “भारताला पूर्ण क्षमतेने उभे करायचे असेल तर कोणत्याही भारतीयाला संधीची कमतरता भासू नये हे सूत्र महत्त्वाचे आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञान सुलभ आणि परवडणारे बनवणे हे यासाठी महत्त्वाचे आहे. सर्व गावांना ऑप्टिकल फायबर आणि सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे माहीती सहज उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे खेड्यांमध्ये डिजिटल उद्योजकतेला चालना मिळाली आहे. त्याचप्रमाणे युपीआय ने लहान व्यवसाय आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना बँकिंग सेवांचा उपयोग करण्यास मदत केली आहे असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत देशात होत असलेल्या तंत्रज्ञान क्रांतीने रेडिओ आणि विशेषत: एफएमला नवीन स्वरूप दिले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. इंटरनेटची व्याप्ती वाढत असल्याकडे लक्ष वेधून मुलाखती (पॉडकास्ट) आणि ऑनलाइन एफएमच्या माध्यमातून रेडिओ नाविन्यपूर्ण मार्गांनी समोर आला आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. “डिजिटल इंडियाने केवळ रेडिओला नवीन श्रोतेच दिले नाहीत तर एक नवीन विचार प्रक्रिया देखील दिली आहे”. प्रत्येक प्रसारण माध्यमात हीच क्रांती दिसून येते असे ते म्हणाले. देशातील सर्वात मोठे डीटीएच व्यासपीठ असलेल्या डीडी फ्री डिशच्या सेवा 4 कोटी 30 लाख घरांपर्यंत पोहचत असल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरातील माहिती कोट्यवधी ग्रामीण कुटुंबांपर्यंत आणि सीमेजवळील भागातील घरापर्यंत वास्तविक वेळेत पोहोचत आहे असे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून वंचित राहिलेल्या समाजातील घटकांपर्यंत शिक्षण आणि मनोरंजनही पोहोचत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “यामुळे समाजातील विविध घटकांमधील असमानता दूर झाली आहे आणि प्रत्येकाला दर्जेदार माहिती उपलब्ध झाली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. डीटीएच वाहिन्यांवर विविध प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामध्ये एकापेक्षा जास्त विद्यापीठांचे ज्ञान थेट घरोघरी पोहोचत असल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्याना, विशेषतः कोरोना काळात खूप मदत झाली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “डीटीएच असो किंवा एफएम रेडिओ, ही शक्ती आपल्याला भविष्यातील भारतात डोकावण्याची संधी देते. या भविष्यासाठी आपण स्वत:ला तयार केले पाहिजे,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी भाषिक विविधतेच्या परिमाणांना स्पर्श करत नमूद केले,की आता एफएम प्रसारण सर्व भाषांमध्ये आणि विशेषत: 27 विविध भाषिक प्रदेशांमध्ये प्रसारित होईल. प्रत्यक्ष संपर्काला प्रोत्साहन देण्यासोबत सामाजिक संपर्कावर भर देण्यात येत असल्याचे महत्व अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले,“या कनेक्टिव्हिटीमुळे केवळ संपर्काची साधने जोडली जात नाही तर, तर ती लोकांनाही एकमेकांसोबत जोडते. हेच या सरकारच्या कार्यसंस्कृतीतून दिसून येत आहे”. "आमचे सरकार सांस्कृतिक तसेच बौद्धिक संपर्क बळकट करत आहेत", असेही पंतप्रधान म्हणाले. प्रतिभावान नामवंतांचा गौरव करून पद्म आणि इतर पुरस्कारांची खऱ्या अर्थाने जनपुरस्कार म्हणून ओळख निर्माण करण्यात येत असल्याचे उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केले. "पूर्वीच्याप्रमाणे केवळ शिफारशींवर आधारित न ठेवता, देश आणि समाजाच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्यांनाच पद्म पुरस्कार प्रदान केले जात आहेत", असे ही पंतप्रधान पुढे म्हणाले.
देशाच्या विविध भागांतील तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांच्या पुनरुज्जीवनानंतर पर्यटनाला चालना मिळाली आहे, असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, "पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या लोकांची वाढती संख्या ही देशातील सांस्कृतिक नाती दृढ होत असल्याचा पुरावा आहे." आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देणारी संग्रहालये, बाबासाहेब आंबेडकरांचे पंचतीर्थ, पीएम म्युझियम आणि राष्ट्रीय युध्दस्मारक (नॅशनल वॉर मेमोरिअल) याची उदाहरणे पंतप्रधानांनी दिली आणि अशा उपक्रमांमुळे देशातील बौद्धिक आणि भावनिक संबंध वृध्दिंगत होण्याला नवा आयाम मिळाला असल्याचे, पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी ऑल इंडिया रेडिओसारख्या सर्व वाहिन्यांची दूरदृष्टी आणि ध्येय यांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, की कनेक्टिव्हिटी कोणत्याही स्वरूपात असो, देश आणि 140 कोटी नागरिकांना जोडणे हा त्याचा उद्देश आहे. सर्व हितसंबंधित या ध्येयासह मार्गक्रमण करत राहतील, परिणामी सतत होणाऱ्या सुसंवादातून देश मजबूत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Inauguration of 91 FM transmitters will revolutionise the radio industry in India. https://t.co/wYkBbxGHqT
— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2023
देशातील FM कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये 91 नवीन 100W FM ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. या विस्ताराचा विशेष भर आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागातील व्याप्ती वाढवण्यावर आहे. यामधे बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, लडाख आणि अंदमान आणि निकोबार बेटे, अशा विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे. आकाशवाणीच्या एफएम सेवेच्या या विस्तारामुळे, ज्यांना या माध्यमाची कनेक्टिव्हीटी उपलब्ध नव्हती त्या अतिरिक्त 2 कोटी लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार असून सुमारे 35,000 चौरस किमी क्षेत्र विस्तारले जाणार आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात रेडिओ बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. मोठ्या प्रमाणात श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याच्या या माध्यमाच्या अनोख्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रम सुरू केला, जो आता लवकरच 100 व्या भागाचा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे.