शरद पवार (Sharad Pawar),ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा एकखांबी तंबू असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या राष्ट्रीय पक्षांची ओळख आता केवळ प्रादेशिक पक्ष अशीच राहण्याची शक्यता आहे. अशी ओळख ठरु पाहणारे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच नव्हे तर कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) हा पक्षही त्याच वाटेवर असल्याची चिन्हे आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून या पक्षांची कामगिरी प्रचंड निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष हा दर्जा प्रप्त होण्यासाठी लागणारे निकष हे पक्ष पूर्ण करण्यास काही अंशी अपयशी ठरल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरुन आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेण्यात येऊ नये, असा सवाल निवडणूक आयोग या पक्षांना विचारण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने तशा आशयाचे पत्रही या पक्षांना पाठवल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
सध्या देशात राष्ट्रीय पक्ष किती?
सध्या देशात असलेल्या राष्ट्रीय पक्षांची संख्या एकूण 7 इतकी आहे. त्यात काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे.
राष्ट्रीय पक्षांचा दर्जा कसा ठरतो?
कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याबाबत निवडणूक आयोगाने 1968 मध्ये नियम बनवला. त्या नियमानूसार कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी कमीत कमी चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक अथवा त्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवणे बंधनकारक आहे. तसेच, त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार असणे आवश्यक आहे. हे निकष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही नोंदणीकृत राजकीय पक्षाला राजकीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. दरम्यान, या पक्षांना तीन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांतून खासदार निवडून आणतानाच चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळविण्याची कामगिरीही करावी लागते.
दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची ही कामगिरी तपासण्याच्या नियमामध्ये २०१६ मध्ये बदल केला. त्यानुसार, राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी पाच वर्षांऐवजी दहा वर्षांच्या कामगिरीचा विचार केला जातो.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, CPI, हे पक्ष निवडणूक आयोगाच्या 2016 च्या नियमानुसार दमदार कामगिरी करण्यास काहीसे अपयशी ठरले आहेत. नाही म्हणायला विद्यमान लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच खासदार आहेत. तसेच, टीएमसी, सीपीआय आदी पक्षांचेही खासदार लोकसभेत आहेत. पण, राष्ट्रवादी काँग्रेस - महाराष्ट्र, तृणमूल काँग्रेस - पश्चिम बंगाल, सीपीआय पश्चिम बंगाल आणि देशातील इतर राज्यांमध्ये कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.